FIFA World Cup 2022: जगातील सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा फिफा विश्वचषक 2022 स्पर्धेला येत्या 20 नोव्हेंबर 2022 पासून सुरुवात होत आहे. कतारमध्ये (Qatar) प्रथमच होणारी ही स्पर्धा सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. फिफा विश्वचषकापूर्वी कतार सरकारनं काही विचित्र नियमावली तयार केलीय, ज्याचं पालन न केल्यास संबंधित व्यक्तीला तुरूंगात जावं लागणार आहे. कतार सरकारच्या नियमांमुळं खेळाडू आणि प्रेक्षकांसह सर्वानाच अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तर, फुटबॉल प्रेक्षकांनाही सामन्याचा पूर्णपणे आनंद घेता येणार नाही, हे निश्चित झालंय. 


महिलांच्या कपड्यांसाठी नियम काय?
इस्लामिक देश असल्यानं कतारमधील प्रत्येक महिला चाहत्यांना त्यांच्या शरीराचा वरचा भाग झाकून ठेवावा लागणार आहे. तसेच, त्यांना गुडघ्यापेक्षा वरचे कपडे घालण्याची परवानगी दिली जाणार नाही. कतारमध्ये सर्व महिला चाहत्यांना कोणत्याही प्रकारचे घट्ट कपडे घालण्यावर पूर्णपणे बंदी आहे. 


स्टेडियममध्ये टी-शर्ट काढल्यास...
कतारमध्ये महिला चाहत्यांसह तसेच पुरुष चाहत्यांवरही अनेक बंधनं लावली गेली आहेत. चाहत्यांना स्टेडियममध्ये शर्ट काढण्याची परवानगी नाही. पुरुषांना लांब कार्गो पॅंट आणि त्यांचे गुडघे झाकणारे हलके चिनोज घालण्याची परवानगी देण्यात आलीय.


मद्यपानावर बंदी
कतारमध्ये मद्यपानावर बंदी घालण्यात आली आहे. परंतु या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर सरकारनं विविध ठिकाणी फॅन झोन तयार केले आहेत. चाहते फक्त या ठिकाणी दारू खरेदी करू शकतात आणि पिऊ शकतात. सार्वजनिक ठिकाणी दारू  सेवन करण्यास मनाई आहे. याशिवाय, पत्नी आणि पती व्यतिरिक्त इतर कोणत्याही स्त्री किंवा पुरुषाशी संबंध ठेवण्यास देखील मनाई आहे. कतारमध्ये समलैंगिकता हा गुन्हा आहे. अशा गुन्ह्यांसाठी परदेशी नागरिकांना सात वर्षांचा तुरुंगवासही होऊ शकतो.


लाइव्ह टेलिकास्ट आणि स्ट्रीमिंग कुठे बघू शकता?
Viacom-18 कडे भारतातील FIFA विश्वचषक 2022 चे प्रसारण हक्क आहेत. ज्यामुळे स्पोर्ट्स-18 आणि स्पोर्ट्स-18 एचडी चॅनेलवर सामन्यांचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. तसंच VOOT Select आणि Jio TV वर सामन्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल. हे सर्व सामने कतारच्या वेगवेगळ्या आठ स्टेडियममध्ये खेळवले जातील. संपूर्ण विश्वचषकात 64 सामने होणार आहेत. अंतिम-4 मध्ये पोहोचणारे संघ 7-7 सामने खेळतील.


 


हे देखील वाचा-