FIFA WC 2022 Qatar: फिफा विश्वचषक 2022 (FIFA WC 2022) मध्ये नेदरलँडच्या फुटबॉल संघानं (Netherland) आपला पहिला सामाना जिंकत पॉईंट टेबलमध्ये 3 गुणांची आघाडी घेतली आहे. अत्यंत चुरशीच्या सामन्यात नेदरलँड्सनं सेनेगलविरुद्ध (Senegal) 2-0 असा विजय मिळवला आहे. सामन्याची पहिली 85 मिनिटं दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही, मात्र त्यानंतर नेदरलँड्सनं गोल डागत तीन पॉईंट्स आपल्या नावे केले. हा सामना जिंकणं तसं नेदरलँड्ससाठी तसं सोपं नव्हतं, सेनेगलच्या फुटबॉल संघानं त्यांना कडवी झुंज दिली. या सामन्यात नेदरलँड्सला खूप संघर्ष करावा लागला, पण अखेर सेनेगलविरोधात दोन गोल डागत नेदरलँड्सनं विजयाला गवसणी घातलीच. 


फर्स्ट हाफमध्ये एकही गोल नाही


सेनेगलचा संघ सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमक दिसत होता. सामन्याच्या पहिल्याच मिनिटात गोल डागण्याचा सेनेगलचा प्रयत्न हुकला. पण त्यानंतर मिळालेल्या कॉर्नर किकवरही सेनेगल काही करू शकला नाही. पहिल्या 15 मिनिटांमध्ये सामन्यात  सेनेगलचं वर्चस्व दिसलं. या वेळेत सेनेगलनं फ्री किक्सही मिळवल्या, पण त्यांचा फारसा उपयोग झाला नाही. त्यानंतर नेदरलँड्सनं दोन प्रयत्न केले, पण दोन्ही प्रयत्न अपयशी ठरले. सामन्याच्या 27व्या मिनिटाला व्हर्जिल व्हॅन डायकच्या हेडरनं नेदरलँड्स गोलच्या जवळ पोहोचला, पण हा प्रयत्नही हुकला. सामन्याच्या फर्स्टहाफमध्ये दोन्ही संघांनी गोल डागण्याचे प्रयत्न केले, पण दोघांचेही प्रयत्न अपयशी ठरले. 


सेकेंड हाफमध्ये नेदरलँड्सचं वर्चस्व 


सेकेंड हाफमध्ये सुमारे 40 मिनिटांच्या खेळात दोन्ही संघांनी गोल करण्याचा सातत्यानं प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आलं नाही. नेदरलँड्सच्या विजयाचं श्रेय काही प्रमाणात त्यांच्या गोलरक्षकाला नक्कीच जातं. सेनेगलचा प्रयत्न धुळीस मिळवण्यात त्यानं महत्त्वाची भूमिका बजावली. नेदरलँडच्या गोलरक्षकानं दोन उत्कृष्ट सेव्ह केले नाहीतर सेनेगलला सामन्यात सहज आघाडी मिळाली असती. नेदरलँड्सनं अखेर 85व्या मिनिटाला डाव साधत सामन्यात आघाडी घेतली. फ्रँकी डी जोंगच्या क्रॉसवर कोडी गॅप्कोनं शानदार हेडरद्वारे गोल केला. त्याच्या पुढच्याच मिनिटाला सेनेगलनंही गोल करण्याचा प्रयत्न केला, पण तो यशस्वी झाला नाही. 


सामन्याची वेळ संपल्यानंतर आठ मिनिटांचा अतिरिक्त वेळ जोडण्यात आला. ज्यामध्ये सेनेगलकडे स्कोअर बरोबरीत आणण्याची संधी होती. सेनेगलनं जीवाच्या आकांतानं प्रयत्नही केला, पण सेनेगलचा प्रयत्न अयशस्वी ठरला. अखेर अतिरिक्त वेळेच्या शेवटच्या मिनिटात नेदरलँड्सनं काउंटर अटॅकची संधी साधली. मेनमिस डेपेचा शॉट सेनेगलचा गोलरक्षक मेंडीनं रोखला, पण डेव्ही क्लासेननं रिबाऊंडवर गोल करून नेदरलँड्सचा विजय निश्चित केला.