Fifa World Cup 2022 : फिफा विश्वचषक स्पर्धेत  (Fifa WC) आज सर्व जग वाट पाहत असलेला लिओनल मेस्सी मैदानात उतरणार आहे. अर्जेंटिना संघाचं नेतृत्त्व करताना मेस्सी मैदानात उतरत असून आज अर्जेंटिना संघासमोर सौदी अरेबियाचं आव्हान असणार आहे. विशेष म्हणजे अर्जेंटिना मागील 36 सामन्यांपासून अपराजित आहे आणि शेवटच्या पाच सामन्यांत त्यांनी एकतर्फी विजय मिळवला आहे. या पाच सामन्यांमध्ये अर्जेंटिनाच्या फॉरवर्ड्सने 16 गोल केले आहेत. याशिवाय फिफा क्रमवारीत अर्जेंटिना तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच वेळी, सौदी अरेबियाची रँकिंग 51 आहे. अशा स्थितीत हा सामना अर्जेंटिनाच्या बाजूने एकतर्फी होऊ शकतो. 


विशेष म्हणजे यंदा विश्वचषक विजयाच्या दावेदारांमध्ये अर्जेंटिना आघाडीवर आहे. लिओनेल मेस्सीचाही हा शेवटचा विश्वचषक असल्याने जगभरातील मेस्सीचे चाहते यावेळी अर्जेंटिनाच्या विजयासाठी प्रार्थना करत आहेत. सध्या हा संघही उत्कृष्ट लयीत आहे. अशा स्थितीत अर्जेंटिना पुन्हा एकदा 1978 आणि 1986 च्या इतिहासाची पुनरावृत्ती करून विश्वचषक जिंकेल अशी अपेक्षा आहे.


कोणत्या खेळाडूंवर असेल नजर?


लिओनल मेस्सी मैदानात असताना त्याच्याकडेच सर्व चाहत्यांची नजर असते. मेस्सी अर्जेंटिनासाठी प्लेमेकरच्या भूमिकेत असेल. त्याच्यासोबत एंजल डी मारिया, लिएंड्रो परेडेज आणि निकोलस ऑटोमेंडी या स्टार खेळाडूंवरही नजर असेल. दुसरीकडे, सौदी अरेबियाचा संघ त्यांचा सेंटर बॅक खेळाडू अब्दुल्ला अल आमरी आणि लेफ्ट बॅक यासिर अल शाहरानी यांच्यावर अवलंबून असेल. फॉरवर्ड खेळाडूमध्ये फिरास अल-बुरैकानकडून काहीतरी अपेक्षा केली जाऊ शकते


कसा आहे आजवरचा इतिहास?


दोन्ही संघांमधील आतापर्यंत झालेल्या चार सामन्यांमध्ये अर्जेंटिनाने दोन सामने जिंकले असून दोन सामने अनिर्णित राहिले आहेत. अर्जेंटिना आणि सौदी अरेबिया यांच्यातील हा पाचवा सामना आहे. दोघांच्या हेड टू हेड रेकॉर्डचा विचार केल्यास आतापर्यंत झालेल्या चार सामन्यांतील दोन सामने अर्जेंटिनाने जिंकले असून दोन सामने अनिर्णित राहिले आहेत. 


कधी, कुठे पाहाल सामना?


आजचा हा अर्जेंटिना विरुद्ध सौदी अरेबिया सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सुरु होणार आहे. दरम्यान Viacom-18 कडे भारतातील FIFA विश्वचषक 2022 चे प्रसारण हक्क आहेत. ज्यामुळे स्पोर्ट्स-18 आणि स्पोर्ट्स-18 एचडी चॅनेलवर सामन्यांचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. तसंच VOOT Select आणि Jio TV वर सामन्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.



हे देखील वाचा-