Fifa world cup 2022 Prize money : कतारमध्ये सुरु फिफा विश्वचषक स्पर्धा (Fifa WC) आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. फ्रान्स आणि अर्जेंटिना (France vs Argentina) या दोन संघामध्ये आज फायनलचा सामना रंगणार आहे. उपांत्य फेरीत फ्रान्सने मोरोक्कोचा तर अर्जेंटिनाने क्रोएशियाचा पराभव करत फायनल गाठली असून आज दोघांमध्ये सामना रंगणार आहे. विशेष म्हणजे विजेत्या संघाला कोट्यवधी रुपये मिळणार आहेतच, पण उपविजेत्या संघासह स्पर्धेतील सर्वच संघावर बक्षिसांचा वर्षाव होणार आहे


फिफा विश्वचषक स्पर्धेच्या यंदाच्या 22 व्या हंगामात एकूण 440 दशलक्ष डॉलर्संची रक्कम बक्षीस म्हणून वितरित केली जाईल. मागील हंगामापेक्षा ही रक्कम 40 दशलक्ष डॉलर्स अधिक आहे. यावेळी, ट्रॉफी व्यतिरिक्त, फिफा विजेत्या संघाला 42 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 344 कोटी भारतीय रुपये) इतकी रक्कम दिली जाईल. त्याच वेळी, उपविजेत्या संघाला 30 दशलक्ष डॉलर (सुमारे 245 कोटी भारतीय रुपये) बक्षीस म्हणून दिले जातील.


सर्वच संघावर बक्षिसांचा वर्षाव


अंतिम फेरीतील विजेत्या आणि उपविजेत्या संघाच्या व्यतिरिक्त, तिसऱ्या क्रमांकाच्या संघाला 27 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 220 कोटी भारतीय रुपये) दिले जातील. तिसऱ्या क्रमांकासाठी मोरोक्को आणि क्रोएशिया 17 डिसेंबरला एकमेंकाविरुद्ध भिडणार आहेत. तसंच, चौथ्या क्रमांकाच्या संघाला 25 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 204 कोटी भारतीय रुपये) दिले जाणार आहेत. तसंच 5 ते 8 या क्रमांकावर असलेल्या संघांना 17 मिलियन डॉलर्स (सुमारे 138 कोटी भारतीय रुपये) दिले जातील. यानंतर 9 ते 16 व्या क्रमांकावरील संघांना 13 मिलियन डॉलर्स (सुमारे 106 कोटी भारतीय रुपये) दिले जातील. त्याच वेळी, 17 ते 32 व्या क्रमांकावरील संघांना बक्षीस म्हणून 9 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 74 कोटी भारतीय रुपये) दिले जाणार आहेत. 2018 मध्ये खेळल्या गेलेल्या विश्वचषक स्पर्धेत विजेत्या फ्रान्सला 38 मिलियन डॉलर (सुमारे 314 कोटी भारतीय रुपये) बक्षीस म्हणून देण्यात आले होते. दुसरीकडे, उपविजेत्या क्रोएशियाला 28 (सुमारे 231 कोटी भारतीय रुपये) दशलक्ष डॉलर्स देण्यात आले होते, त्यामुळे यंदा ही रक्कम वाढल्याचं दिसून येत आहे.


हे देखील वाचा-