FIFA World Cup: ब्राझीलचा संघ (Brazil Football Team) फिफा विश्वचषक 2022 च्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. सोमवारी भारतीय वेळेनुसार, रात्री उशिरा स्टेडियम 974 येथे खेळवण्यात आलेल्या प्री-क्वार्टर फायनल सामन्यात ब्राझीलनं दक्षिण कोरियाचा 4-1 असा पराभव केला. या विजयासह ब्राझीलनं सलग आठव्यांदा आणि एकूण 17 व्यांदा विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. आता उपांत्यपूर्व फेरीत ब्राझीलचा सामना गतवेळचा उपविजेता संघ क्रोएशियासोबत (Croatia Football Team) होणार आहे.
ब्राझीलच्या या दमदार विजयाचा मानकरी कोणी असेल तर तो म्हणजे, नेमार. खरं तर नेमार दुखापतीमुळं दोन सामन्यांसाठी संघाबाहेर होता. पण परत येताच त्यानं आपली जादू दाखवून दिली. त्यानं एक गोल आणि एक असिस्ट केला. नेमार व्यतिरिक्त व्हिनिसियस ज्युनियर, रिचार्लिसन आणि लुकास पक्वेटा यांनीही ब्राझीलसाठी दमदार गोल डागले. कालच्या सामन्यात गोल डागून नेमार विक्रमाच्या आणखी जवळ पोहोचला आहे. कालच्या सामन्यात डागलेला गोल ब्राझीलसाठी नेमारनं केलेला 76 वा गोल होता. त्यामुळे देशासाठी सर्वाधिक गोल करणारा खेळाडू होण्यापासून नेमार फक्त दोन पावलं दूर आहे. ब्राझीलसाठी दिग्गट फुटबॉलपटू पेले यांनी सर्वाधिक 77 गोल केले आहेत. त्यामुळे आणखी दोन गोलसोबतच नेमार पेले यांच्या विक्रमाशी बरोबरी करु शकतो.
सामन्याच्या सुरुवातीपासूनच ब्राझीलनं दक्षिण कोरियावर दबाव कायम ठेवला. खेळाच्या सातव्या मिनिटाला व्हिनिसियसनं राफिनहाच्या क्रॉसचं गोलमध्ये रूपांतर केलं आणि ब्राझीलनं 1-0 अशी आघाडी मिळवली. त्यानंतर सहा मिनिटांनी नेमारनं पेनल्टी किकवर गोल करत ब्राझील संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. ब्राझीलला पेनल्टी मिळाली कारण रिचर्डसनला पेनल्टी एरियात जंग वू-यंगने खाली पाडलं होतं.
ब्राझीलचा गोल करण्याचा सिलसिला सुरूच होता आणि रिचर्लिसनने 29व्या मिनिटाला थियागो सिल्वानं दिलेल्या पासमध्ये गोल डागला आणि 3-0 नं आघाडी घेतली. त्यानंतर सात मिनिटांनी लुकास पक्वेटानं गोल करून दक्षिण कोरियाला पूर्णपणे बॅकफूटवर ढकललं.
उत्तरार्धात कोरियानं गोल डागला
ब्राझीलचा संघ 4-0 नं आघाडीवर होता. ब्राझीलचा संघ गोल डागण्याचे प्रयत्न करत होता, मात्र कोरियाचा गोलरक्षक किम सेउंग-ग्यु यानं त्यांचे प्रयत्न यशस्वी होऊ दिले नाही. पूर्वार्धापेक्षा दक्षिण कोरियाचा संघ उत्तरार्धात आक्रमक खेळी करताना दिसून आला. सामन्याच्या 76व्या मिनिटाला पाईक सेउंग-हो यानं संघासाठी पहिला गोल डागला आणि कोरियानं आपलं खातं उघडलं. पण त्यानंतर मात्र कोरियाला एकही गोल डागता आला नाही.
फिफामध्ये आशियाई संघांच्या पराभवाचं सत्र
दक्षिण कोरियाच्या पराभवानं फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील आशियाई संघांचा (AFC) प्रवास संपला. यापूर्वी जपान आणि ऑस्ट्रेलियालाही उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. जिथे पेनल्टी शूटआऊटमध्ये क्रोएशियानं जपानचा 3-1 असा पराभव केला आणि ऑस्ट्रेलियाचा अर्जेंटिनाकडून 2-0 असा पराभव झाला. याशिवाय सौदी अरेबिया, इराण आणि कतार या संघांनाही ग्रुप स्टेजच्या पुढे प्रगती करता आली नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
Fifa World Cup 2022 : आता मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार फिफा वर्ल्डकपचा थरार, वाचा सविस्तर