FIFA World Cup 2022: दोन वेळचा विश्वविजेता अर्जेंटिनानं फिफा विश्वचषक 2022 साठी आपला संघ जाहीर केलाय. या 26 सदस्यीय संघात दुखापतग्रस्त पाउलो डिबेलालाही (Paulo Dybala) स्थान देण्यात आलंय. म्हणजेच अर्जेंटिनाच्या फॉरवर्ड लाईनमध्ये पुन्हा एकदा मेस्सी (Lionel Messi), डी मारिया (Angel Di Maria) आणि डिबेला हे त्रिकूट मैदानात धुमाकूळ घालताना दिसणार आहे.


या स्पर्धेत 35 वर्षीय लिओनेल मेस्सी अर्जेंटिना फुटबॉल संघाचं नेतृत्व करणार आहे. ही त्याची पाचवी आणि कदाचित अखेरची विश्वचषक स्पर्धा असेल. मेस्सीसह, एंजल डी मारिया आणि निकोलस ओटामेंडीसारख्या दिग्गज खेळाडूंसाठीही हा शेवटचा विश्वचषक ठरू शकतो. संघात युवा आणि वरिष्ठ खेळाडूंचा चांगला समतोल आहे. संघात निवडलेले सर्व खेळाडू दिग्गज युरोपियन फुटबॉल क्लबचा भाग आहेत.


ट्वीट-



44 वर्षांचा दुष्काळ संपण्यासाठी मैदानात उतरणार
अर्जेंटिनानं शेवटचा विश्वचषक 1978मध्ये जिंकला होता. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात त्यांनी पश्चिम जर्मनीला पराभवाची धुळ चारली होती. तेव्हापासू म्हणजेच 44 वर्षांपासून अर्जेंटिनाच्या संघाला विश्वचषक जिंकता आला नाही. दरम्यान, दोनदा अर्जेंटिनाचा संघ विजेतेपदाच्या अगदी जवळ पोहचला होता. मात्र अंतिम फेरीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. 1990 मध्ये पश्चिम जर्मनी आणि 2014 मध्ये जर्मनीनं अर्जेंटिनाचा अंतिम फेरीत पराभव केला. 


अर्जेंटिनाचा संघ कोणत्या ग्रुपमध्ये
या स्पर्धेत अर्जेंटिनाच्या संघाचा सी ग्रुपमध्ये समावेश करण्यात आलाय. अर्जेंटिना व्यतिरिक्त या ग्रुपमध्ये साऊदी अरब, मॅक्सिको, पोलँड हे देश देखील आहेत. अर्जेंटिना 22 नोव्हेंबरला सौदी अरेबियाविरुद्धच्या सामन्यानं विश्वचषक मोहिमेची सुरुवात करेल. यानंतर त्याला मेक्सिको आणि पोलंडचा सामना करावा लागणार आहे. म्हणजेच या गटातील स्पर्धा चुरशीची आहे. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ पुढील फेरीसाठी पात्र ठरतील. फिफा क्रमवारीत अर्जेंटिनाचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. या संघानं गेल्या वर्षी कोपा अमेरिका चषकावर नाव कोरलं होतं. यावेळी मेस्सी त्याच्या शेवटच्या विश्वचषकात अर्जेंटिनाचा 44 वर्षांचा दुष्काळ संपवेल, अशी अपेक्षा आहे.


अर्जेंटिनाचा संघ संपूर्ण संघ-


गोलकीपर्स: एमिलियानो मार्टिनेझ, फ्रँको अरमानी, जेरोनिमो रुल्ली
डिफेन्डर्स: गोन्झालो मॉन्टिएल, नहुएल मोलिना, जर्मन पाजेला, क्रिस्टियन रोमेरो, निकोलस ओटामेंडी, लिसांड्रो मार्टिनेझ, जुआन फॉयथ, निकोलस टेग्लियाफिको, मार्कोस अकुना.
मिडफील्डर्स: लिएंड्रो परेदेझ, गुइडो रॉड्रिग्ज, एन्झो फर्नांडेझ, रॉड्रिगो डी पॉल, एक्सक्वेल पॅलासिओस, अलेजांद्रो गोमेझ, अॅलेक्सिस मॅक अॅलिस्टर.
फॉरवर्ड्स: पाउलो डिबेला, लिओनेल मेस्सी, एंजल डी मारिया, निकोलस गोन्झालेझ, जोक्विन कोरिया, लॉटारो मार्टिनेझ, ज्युलियन अल्वारेझ.