Neymar Has Officially Transferred From PSG To Al-Hilal: ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमार ज्युनियरनंही ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पावलावर पाऊल ठेवलं आहे. सौदी अरेबियाचा फुटबॉल क्लब अल-हिलालमध्ये ब्राझीलचा सुपरस्टार खेळाडू नेमार सहभागी झाला आहे. 15 ऑगस्ट रोजी नेमारनं यासंदर्भातील अधिकृत घोषणा केली आहे. सौदी प्रो लीगनंही यासंदर्भात माहिती दिली आहे. 2017 मध्ये, नेमार ज्युनियरला पॅरिस सेंट जर्मन (PSG) क्लबमध्ये सहभागी झाला होता. त्यावेळी नेमारनं पॅरिस सेंट जर्मनसोबत 222 दशलक्ष युरोंचा करार केला होता. आता 900 कोटींहून अधिक रकमेच्या करारासह अल-हिलालनं नेमारला दोन वर्षांसाठी आपल्या क्लबमध्ये समाविष्ट केलं आहे. 


नेमार ज्युनियर जवळपास गेल्या 6 वर्षांपासून पॅरिस सेंट-जर्मनचा भाग आहे. तसेच, असा अंदाज आहे की, अॅड-ऑन आणि बोनस क्लॉजमुळे 2025 सालापर्यंत अल-हिलालमध्ये नेमारची किंमत सुमारे 400 डॉलर्स दशलक्षपर्यंत पोहोचू शकते. आता सौदी प्रो-लीगमध्ये नेमार स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोविरुद्ध खेळताना दिसणार आहे.


नेमारच्या अल-हिलालमध्ये सहभागी होण्यापूर्वी पीएसजी क्लबच्या अध्यक्षांनी त्याच्या योगदानाबद्दल आभार मानले. पीएसजीचे अध्यक्ष नासेर अल खेलाफी यांनी नेमारला एक महान खेळाडू म्हणून संबोधलं आणि क्लबमध्ये सामील झाल्याच्या पहिल्या दिवसाची आठवण करून दिली. ते म्हणाले की, क्लबमधील नेमारचा पहिला दिवस ते आयुष्यात कधीही विसरणार नाहीत.