Argentina vs Panama match : अर्जेंटिना आणि पनामा (ARG vs PAN) यांच्यात गुरुवारी रात्री (23 मार्च) झालेल्या सामन्यात जगातील स्टार फुटबॉल लिओनल मेस्सीने (Lionel Messi) एक मोठी कामगिरी करत आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. या सामन्याच्या 89व्या मिनिटाला त्याने फ्री किकवर अप्रतिम गोल करत त्याच्या एकूण कारकिर्दीतील गोल्सची संख्या 800 वर नेली आहे. अशी कामगिरी करणारा तो जगातील दुसरा फुटबॉलपटू ठरला आहे. पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) कारकिर्दीत 800 गोल करणारा पहिला खेळाडू ठरला आहे.


नुकत्याच झालेल्या फिफा विश्वचषक 2022 (Fifa WC) च्या फायनलमध्ये जिंकल्यानंतर अर्जेंटिनाचा संघ प्रथमच मैदानात उतरला. पनामा देशाविरुद्ध खेळला गेलेला हा सामना ब्युनोस आयर्स येथील 'द मोन्युमेंटल स्टेडियम' येथे खेळला गेला. 84000 प्रेक्षक क्षमता असलेले हे स्टेडियम विश्वविजेता संघाला पाहण्यासाठी पूर्णपणे भरले होते. येथे अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी चाहत्यांना विश्वचषक ट्रॉफी दाखवली आणि शुभेच्छाही दिल्या. यादरम्यान स्टेडियममध्येही मेस्सी-मेस्सीच्या घोषणांचाआवाज घुमत होता.






अर्जेंटिना संघाचं एकतर्फी वर्चस्व


गेल्या वर्षी फिफा विश्वचषक जिंकणाऱ्या संघातील खेळाडूंना घेऊनच अर्जेंटिनाचा संघ या सामन्यात उतरला होता. हा जगज्जेता संघ त्याच शैलीत खेळताना दिसला. बॉल 75% वेळ अर्जेंटिनाकडे राहिला म्हणजेच अधिक पजेशन अर्जेंटिनाकडे होतं. अर्जेंटिनानेही एकूण 26 गोल करण्याचा प्रयत्न केला, प्रत्युत्तरात पनामाचा संघ केवळ दोन गोल करण्याचा प्रयत्न करू शकला. 78व्या मिनिटाला थियागो अल्माडाने अर्जेंटिनासाठी पहिला गोल केला. अवघ्या 11 मिनिटांनंतर लिओनेल मेस्सीने फ्री किकवर गोल करत आपल्या संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. या स्कोअर लाइनवरच सामना संपला आणि अर्जेंटिनाचा संघ 2-0 ने सामना जिंकण्यात यशस्वी ठरला.






FIFA फायनलमध्ये अर्जेंटिनाचा रोमहर्षक विजय


फ्रान्स विरुद्ध अर्जेंटिना (France vs Argentina) फायनलची सुरुवात तशी अर्जेंटिनाकडून झाली 90 मिनिटांच्या सामन्यात 79 मिनिटांपर्यंत अर्जेटिना 2-0 अशा उत्तम आघाडीवर होते. पण त्यानंतर फ्रान्सच्या कायलिन एम्बाप्पेनं (kylian mbappe) अद्भुत खेळ दाखवत हॅट्रिक केली. मेस्सीनंही झुंज देत आणखी एक गोल केला आणि सामना 3-3 अशा बरोबरी आला, ज्यामुळे पेनल्टी शूटआऊट (Penalty Shootout) झालं. ज्यात अर्जेंटिनाचा गोलकिपर मार्टीनेज आणि संघानं अप्रतिम कामगिरी कर त 4-2 अशा फरकानं सामना जिंकला आणि अखेर मेस्सीच्या अर्जेंटिनानं फिफा वर्ल्ड कप जिंकला.  


हे देखील वाचा-