Cristiano Ronaldo's Stats : पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) सर्वाधिक आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामने खेळणारा खेळाडू ठरला आहे. त्याने कुवेतच्या बदर अल-मुतावाला मागे टाकत हा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. बादरने आपल्या कारकिर्दीत एकूण 196 सामने खेळले. होते दरम्यान ख्रिस्तियानो रोनाल्डो गुरुवारी रात्री (23 मार्च) लिकटेंस्टीनविरुद्ध मैदानात उतरला तेव्हा तो त्याच्या कारकिर्दीतील 197 वा सामना होता. युरो कप 2024 च्या या क्वालिफायर सामन्यात रोनाल्डोने ही खास कामगिरी केली आहे. या सामन्यात त्याने दोन गोल देखील केले. सामन्यात पोर्तुगालने लिकटेंस्टीनचा 4-0 असा पराभव केला.


रोनाल्डोचे दोन दमदार गोल


या सामन्यात पोर्तुगालच्या संघाने एकतर्फी वर्चस्व गाजवलं. 8 व्या मिनिटाला जो कॉन्सेलोच्या गोलमुळे पोर्तुगालने आघाडी घेतली. बर्नार्डो सिल्वाने 47 व्या मिनिटाला ही आघाडी दुप्पट केली. यानंतर रोनाल्डोने कहर केला. त्याने प्रथम 51व्या मिनिटाला पेनल्टी स्पॉटवरून गोल केला आणि त्यानंतर 63 व्या मिनिटाला अप्रतिम फ्री किकवर गोल केला.


हा विक्रमही रोनाल्डोच्या नावावर


या सामन्यात गोल करताना 38 वर्षीय रोनाल्डोने आणखी एक मोठा विक्रम केला. 100 सामन्यांमध्ये गोल करणारा तो पहिला फुटबॉलपटू ठरला. तसंच रोनाल्डो हा सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणारा खेळाडू देखील आहे. या दोन गोलमुळे त्याने आपला विक्रम आणखी मजबूत केला आहे. रोनाल्डोने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत एकूण 120 आंतरराष्ट्रीय गोल केले आहेत.


करिअरमध्ये 800 हून अधिक गोल  


ख्रिस्तियानो रोनाल्डो हा त्याच्या कारकिर्दीत 800 गोल करणारा पहिला फुटबॉलपटू होता. नुकताच मेस्सी असा दुसरा फुटबॉलपटू ठरला आहे. यासोबतच 5 वेगवेगळ्या विश्वचषकांमध्ये गोल करणारा ख्रिस्तियानो रोनाल्डो हा एकमेव फुटबॉलपटू आहे. 


5 लीग, 5 क्लब आणि 500 हून गोल


ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात पोर्तुगालमधील स्पोर्टिंग लिस्बन क्लबमधून झाली. त्याने आपल्या पहिल्या फुटबॉल क्लबसाठी एकूण तीन गोल केले. एका हंगामानंतर तो लिस्बनहून मँचेस्टर युनायटेडला गेला. त्याने मँचेस्टर युनायटेडसाठी एकूण 103 गोल केले. त्यानंतर रिअल माद्रिदसाठी (311) सर्वाधिक गोल त्याने केले. त्याने इटलीच्या आघाडीच्या क्लब युव्हेंटससाठी देखील 81 गोल केले. सध्या तो सौदी अरबेयामधील क्लब अल नासरसाठी खेळत असून त्यांच्याकडूनही गोल करण्यास सुरुवात केल्याने रोनाल्डोने आतापर्यंत 5 फुटबॉल लीगमध्ये खेळताना 5 वेगवेगळ्या फुटबॉल क्लबच्या जर्सीमध्ये 500 हून अधिक लीग गोल केले आहेत.


हे देखील वाचा-