मुंबई : क्रिकेटच्या प्रेमात आकंठ बुडालेला आपला भारत आज फुटबॉलक्रांतीच्या उंबरठ्यावर उभा आहे. निमित्त आहे सतरा वर्षांखालील वयोगटाच्या फिफा विश्वचषकाचं. 24 देशांचा सहभाग असलेल्या या विश्वचषकाला आजपासून सुरुवात होत आहे.


भारतातली क्रिकेटची लोकप्रियता भविष्यात फुटबॉलला मिळणार का, या प्रश्नाचं उत्तर कदाचित हा विश्वचषक देणार आहे.

जगभरातून आलेल्या युवा फुटबॉलवीरांकडून पुढचे तीन आठवडे साऱ्या भारतवासियांचं आता हेच मागणं राहील, की करके दिखला दे गोल... या मागणीचं निमित्त आहे ते भारतात आयोजित अंडर सेव्हन्टीन फिफा विश्वचषकाचं. सतरा वर्षांखालील वयोगटासाठीच्या फिफा विश्वचषकाचा पडदा उघडायला आता काही तासांचाच अवधी उरला आहे.

कोलंबिया विरुद्ध घाना या नवी दिल्लीतल्या आणि न्यूझीलंड विरुद्ध टर्की या नवी मुंबईतल्या सामन्यानं अंडर सेव्हन्टीन विश्वचषकाची नांदी गायली जाईल आणि त्यानंतर पुढचे 21 दिवस नवी दिल्ली आणि नवी मुंबईसह गोवा, कोची, कोलकाता आणि गुवाहाटीतही अंडर सेव्हन्टिन फिफा विश्वचषक सामन्यांचा खेळ रंगेल.

यजमान भारतासह या विश्वचषकासाठी 24 संघ पात्र ठरले असून, या 24 संघांची 6 गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटातून साखळी सामन्यांअखेर सर्वोत्तम दोन संघ आणि सहा गटांमधून तिसऱ्या क्रमांकाचे चार सर्वोत्तम संघ असे मिळून 16 संघ बाद पद्धतीच्या उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरतील. अंडर सेव्हन्टीन फिफा विश्वचषकाच्या कालावधीत म्हणजे 6 ते 28 ऑक्टोबर या कालावधीत सहा शहरांमध्ये मिळून 52 सामन्यांचं आयोजन करण्यात येईल. कोलकात्याच्या सॉल्ट लेक स्टेडियमवर 28 ऑक्टोबरला या विश्वचषकाचा अंतिम सामना खेळवण्यात येईल.

अंडर सेव्हन्टीन फिफा विश्वचषकात भारताचा समावेश अमेरिका, कोलंबिया आणि घानाच्या अ गटात करण्यात आला आहे.

भारताच्या तुलनेत अमेरिका, कोलंबिया आणि घाना हे तिन्ही संघ खूपच बलाढ्य आहेत. त्यामुळे ‘अ’ गटातून बाद फेरी गाठणं भारतासाठी अशक्यच आहे. पण यजमान या नात्यानं फुटबॉलच्या फर्स्ट वर्ल्डमध्ये खेळण्याची लाभलेली संधी भारतासाठी मोठी पर्वणी ठरावी.

फिफा विश्वचषकाच्या इतिहासात भारताची कोणत्याही वयोगटाच्या मुख्य स्पर्धेत खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे. 1950 साली भारताला ब्राझिलमधल्या सीनियर फिफा विश्वचषकात खेळण्याचं आमंत्रण मिळालं होतं. पण भारताला त्या विश्वचषकातून माघार घ्यावी लागली त्याची अनेक कारणं सांगितली जातात. त्यापैकी एक कारण म्हणजे भारतीय खेळाडू त्या काळात अनवाणी खेळत आणि 1950 सालच्या विश्वचषकातही अनवाणी खेळण्याचा आपला हट्ट भारतीय खेळाडूंनी कायम ठेवला. त्यामुळे फिफानं त्यांना विश्वचषकात खेळण्याची परवानगी नाकारली. त्यानंतर तब्बल 57 वर्षांनी अंडर सेव्हन्टिन फिफा विश्वचषक यजमानपदाच्या निमित्तानं भारतीय खेळाडूंना सर्वोच्च दर्जाच्या फुटबॉलचा अनुभव घेता येणार आहे. या विश्वचषकाच्या निमित्तानं देशात फुटबॉलच्या सर्वोत्तम सुविधा उभ्या राहिल्या आहेत. तसंच देशात फुटबॉलची दर्जेदार प्रशिक्षण पद्धतीही निर्माण झाली आहे. भारतीय फुटबॉलमध्ये नवी उमेद जागवण्यासाठी त्या सुविधा, ती प्रशिक्षण पद्धती नक्कीच लाभदायक ठरावी.