Footballer Gerard Pique Retirement : फुटबॉल खेळात सर्वाधिक प्रसिद्धी ही स्ट्रायकर खेळाडूंना अर्थात गोल करण्यासाठी पुढच्या बाजूस खेळणाऱ्यांना मिळते. पण अशातही एक डिफेन्डर असूनही जागतिक फुटबॉलमधला स्टार खेळाडू झालेल्या फुटबॉलरमधील एक नाव म्हणजे, जेरार्ड पिक (Gerard Pique). स्पेनकडून खेळणाऱ्या पिकने 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा केलं होतं. त्यानंतर आता बार्सिलोना क्लबची शान असणाऱ्या पिकने नुकतीच निवृत्तीची क्लब फुटबॉलमधूनही निवृत्तीची घोषणा केली आहे. शनिवारी अल्मेरिया फुटबॉल क्लबविरुद्ध होणारा सामना त्याच्या क्लब कारकिर्दीतील शेवटचा सामना असणार आहे. 35 वर्षीय स्पॅनिश खेळाडू पिकने ट्वीटरवर एका पोस्टद्वारे निवृत्तीची घोषणा केली आहे.


पिकने ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तो बार्सिलोनासोबतच्या त्याच्या प्रवासाची गोष्ट सांगत आहे. या व्हिडिओमध्ये त्याचा लहानपणापासूनचा प्रवास दिसून येत आहे. आधीपासूनच तो बार्सिलोना संघासोबत मानसिक दृष्ट्याही जोडला गेल्याचं दिसून येत आहे. या ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, 'मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की, ज्या क्षणी मला माझा हा प्रवास संपवायचा आहे तो क्षण मी निवडला आहे. शनिवारी, मी कॅम्पानाऊ (बार्सिलोना स्टेडियम) येथे शेवटचा सामना खेळणार आहे. बार्सिलोना नंतर मी इतर कोणत्याही संघासोबत जाणार नाही.'


पाहा VIDEO-






फिफा विश्वचषक विजेत्या संघात होता पिक


बार्सिलोना संघाकडून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पिकने त्याचा देश स्पेनकडूनही अप्रतिम कामगिरी केल्याचं दिसून आलं आहे. 2009 ते 2018 अशी 9 वर्षे स्पेन नॅशनल टीमकडून खेळताना त्याने एक डिफेंडर म्हणून कायमच संघासाठी मोलाचं योगदान दिलं. 2010 मध्ये फिफा विश्वचषक आणि 2012 मध्ये युरो कप जिंकणाऱ्या स्पॅनिश संघाचाही तो भाग होता. फुटबॉल जगतातील सर्वोत्तम डिफेंडर्समध्ये जेरार्डची गणना होते. 


बार्सिलोना संघासाठी खास कामगिरी


बार्सिलोनासोबत जेरार्ड पिकचा प्रवास खूप अगदी अविस्मरणीय असा आहे. बार्सिलोनासोबत असताना त्याने तीन चॅम्पियन्स लीग जिंकले आहेत. जेरार्डने बार्सिलोनासह 8 ला लीगा, 7 कोपा डेल रे, 3 क्लब वर्ल्ड कप, 3 युरोपियन सुपर कप, 6 स्पॅनिश सुपर कप जिंकले आहेत. त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात मँचेस्टर युनायटेडमधून केली. जेरार्डने या इंग्लिश क्लबसोबत चॅम्पियन्स लीग, प्रीमियर लीग आणि इंग्लिश लीग कपही जिंकले होते. जेरार्डने बार्सिलोनासाठी 315 सामने खेळले असून एक डिफेंडर असूनही त्याने 52 गोल्स देखील केले आहेत.