FIFA 2018 : पेनल्टी शूटआऊटमध्ये क्रोएशियाचा डेन्मार्कवर सनसनाटी विजय
एबीपी माझा वेब टीम | 02 Jul 2018 08:37 AM (IST)
उपउपांत्यपूर्व फेरीत पेनल्टी शूटआऊटमध्ये क्रोएशियाने डेन्मार्कवर सनसनाटी विजय मिळवला आहे. क्रोएशियानं पेनल्टी शूटआऊटमध्ये डेन्मार्कवर 3-2 ने मात करत, उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले.
मोस्को ( रशिया ) : फिफा विश्वचषकाच्या क्रोएशियाची विजयी घोडदौड सुरुच आहे. उपउपांत्यपूर्व फेरीत पेनल्टी शूटआऊटमध्ये क्रोएशियाने डेन्मार्कवर सनसनाटी विजय मिळवला आहे. क्रोएशियानं पेनल्टी शूटआऊटमध्ये डेन्मार्कवर 3-2 ने मात करत, उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले. उपांत्यपूर्व फेरीत क्रोएशियाचा सामना यजमान रशियाशी होणार आहे. क्रोएशिया आणि डेन्मार्कने चांगला खेळ करत सामना बरोबरीत राखला. त्यानंतर जादा वेळेतही कोणत्याही संघाला गोल करता आला नाही. अखेर पंचांनी पेनल्टी शूटआऊटचा निर्णय घेतला. पेनल्टी शूटआऊटमध्ये क्रोएशियाचा गोलरक्षक सुबासिच आणि डेन्मार्कचा गोलरक्षक श्मायकल यांच्या पोलादी बचावातली चुरस पाहायला मिळाली. क्रोएशियाचा गोलरक्षक सुबासिचने डेन्मार्कच्या एरिकसन, डेली आणि यॉर्गनसन यांच्या पेनल्टी थोपवून विजयावर शिक्कामोर्तब केले. तर डेन्मार्कचा गोलरक्षक श्मायकलला क्रोएशियाच्या बेडल आणि पिवारिच यांच्या दोनच पेनल्टी थोपवता आल्या. पेनल्टी शूटआऊटमध्ये क्रोएशियाकडून क्रॅमरिच, मॉडरिच आणि रॅकिटिचनं प्रत्येकी एका गोलची नोंद केली, तर डेन्मार्कच्या सिमॉन केअर आणि शोना यांनी एकेक गोल केला.