मुंबई : रशियातल्या फिफा विश्वचषकाच्या फायनलमध्ये रविवारी फ्रान्सचा मुकाबला क्रोएशियाशी होत आहे. फ्रान्सने याआधी 1998 आणि 2006 साली विश्वचषकाची फायनल गाठली होती. त्यापैकी 1998 साली फ्रान्सने ब्राझिलचा धुव्वा उडवून विश्वचषकावर पहिल्यांदा आपलं नाव कोरलं होतं. पण 2006 साली इटलीने फ्रान्सचं दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न अधुरं ठेवलं. त्यामुळे ह्यूगो लॉरिसची फौज यंदा तब्बल वीस वर्षांनी फ्रान्सला पुन्हा विश्वचषक जिंकून देणार का? याकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलं आहे.

फ्रान्सला फायनलचं तिकीट मिळवून देणाऱ्या गोलनंतर खेळाडूंनी जोरदार सेलिब्रेशन केलं. रशियातल्या सेंट पीटर्सबर्ग स्टेडियममधून सुरु झालेल्या या सेलिब्रेशनचं लोण थेट पॅरिसच्या शॉज एलिजे या राजपथासह देशाच्या कानाकोपऱ्यात परसलं होतं.

तुम्ही म्हणाल की, फ्रान्सने विश्वचषक जिंकायच्या आधीच एवढं मोठं सेलिब्रेशन करण्याची काय गरज? तर या प्रश्नाला काही अर्थ नाही. कारण, ज्या देशात फुटबॉल हा श्वास आहे आणि तो देश तब्बल 12 वर्षांनी फिफा विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक मारणार असेल, तर सेलिब्रेशनला उधाण हे येणारच.

तुम्हाला 2006 सालच्या विश्वचषकाची फायनल आठवते? त्या सामन्यात फ्रान्सच्या झिनेदिन झिदानने इटालीच्या मार्को मॅटेराझीला जादा वेळेत डोक्याने ठोकर मारली होती. परिणामी पंचांनी झिदानला रेड कार्ड दाखवलं होतं आणि त्यानंतरच इटालीने फ्रान्सचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 5-3 असा पराभव करून विश्वचषकावर आपलं नाव कोरलं होतं.

विश्वचषकाच्या फायनलमधल्या त्या पराभवाने फ्रान्सवासियांच्या काळजाला झालेली जखम अजूनही भळभळत आहे. त्यात 2016 साली मायदेशातल्या युरो कपच्या फायनलमध्येही फ्रान्सला ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पोर्तुगालकडून 0-1 अशी हार स्वीकारावी लागली होती. गेल्या बारा वर्षांमधल्या त्या दोन पराभवांची साऱ्या फ्रान्सला बोच लागून राहिली होती. अखेर ह्यूगो लॉरिसच्या फौजेने विश्वचषकाच्या फायनलचं तिकीट कन्फर्म करताच फ्रान्सच्या सेंट पीटर्सबर्ग स्टेडियममधल्या आणि आपल्या देशातल्या सेलिब्रेशनलाही उधाण आलं.

फ्रान्सने आजवरच्या इतिहासात फिफा विश्वचषकावर एकदाच आपलं नाव कोरलं आहे. डिडियर डेशॉच्या नेतृत्त्वाखाली फ्रान्सने 1998 साली फिफा विश्वचषक जिंकला होता. त्या विश्वचषकाच्या फायनलमध्ये डिडियर डेशॉच्या फ्रान्सने ब्राझिलचा 3-0 असा धुव्वा उडवला होता. योगायोगाची गोष्ट म्हणजे यंदा फ्रान्सने पुन्हा विश्वचषकाची फायनल गाठली असताना तेच डिडियर डेशॉ फ्रान्सचे प्रशिक्षक आहेत.

त्यामुळे डिडियर डेशॉ यांना रशियातल्या फिफा विश्वचषकात अनोख्या विक्रमाची संधी आहे. फ्रान्सने विश्वचषक जिंकला, तर एक खेळाडू आणि प्रशिक्षक या दोन्ही भूमिकांमध्ये विश्वचषक जिंकणारे डेशॉ तिसरे फुटबॉलवीर ठरू शकतात. याआधी जर्मनीच्या फ्रान्झ बेकेनबाऊर आणि ब्राझिलच्या मारियो झागलो यांनी खेळाडू आणि प्रशिक्षक या नात्याने विश्वचषक जिंकण्याचा विक्रम केला होता.

बेकेनबाऊर हेही 1974 सालच्या जर्मनीच्या विश्वचषक विजेत्या संघाचे कर्णधार होते. मग त्यांच्याच मार्गदर्शनाखाली जर्मनीने 1990 साली विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. मारियो झागलो याचा ब्राझिलच्या 1958 आणि 1962 सालच्या विश्वचषक संघात समावेश होता. त्यानंतर 1970 साली त्यांनी ब्राझिलचे प्रशिक्षक या नात्याने विश्वचषक जिंकला होता.

फ्रान्सच्या डिडियर डेशॉ यांनी यंदा प्रशिक्षकाच्या भूमिकेत विश्वचषक जिंकला, तर त्यांना बेकेनबाऊर आणि झागलो यांच्या पंक्तीत बसण्याची संधी आहे. ह्यूगो लॉरिस, पॉल पोग्बा आणि किलियान एमबापेचा फ्रान्स संघ डेशॉ यांना तो मान मिळवून देऊ शकतो का? लॉरिसच्या फ्रेन्च फौजेचं सरासरी वय 26 आहे, पण फ्रेन्च आक्रमणाची मदार असलेला किलियान एमबापे अवघा 19 वर्षांचा आहे. डेशॉ यांच्या फ्रान्स संघाने 1998 सालचा फिफा विश्वचषक जिंकला, त्या वेळी एमबापे जन्मालाही आला नव्हता. त्यामुळे फ्रान्सला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची ‘बीस साल बाद’ मिळालेली संधी ही फ्रान्सच्या कितीतरी पिढ्यांना प्रेरित करणारी आहे. फ्रान्सच्या सेंट पीटर्सबर्गमधल्या बेल्जियमवरच्या विजयाने त्याची सुरुवातही झाली आहे.