पिंपरी चिंचवड : रस्त्याचं काम अपूर्ण असूनही टोलवसुली सुरु असल्याने मनसेने पुणे-नाशिक महामार्गावरील चाळकवाडी टोलनाका बंद पाडला. त्यामुळे जुन्नरचे मनसे आमदार शरद सोनवणे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झालाय. चाळकवाडी टोलनाक्याच्या व्यवस्थापनाने आळे फाटा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली.
सोनवणे आणि दीडशे कार्यकर्त्यांनी काल टोल नाका बंद केला होता. जमावबंदी झुगारून केलेल्या आंदोलनामुळे मुंबई कायद्यानुसार आणि कलम 143 नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला. रस्त्याचे अपूर्ण काम असताना टोल आकारला जात असल्याने टोल बंद करण्यात आला होता.
साडे सहा वर्षांपासून या रस्त्याचं काम रखडलेलं आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातून गेल्या वर्षी या रस्त्याचं उद्घाटन केलं होतं. या रस्त्यावर यापूर्वी झालेल्या एका अपघातात एकाच वेळी नऊ जणांना आपला जीव गमवावा लागला होता, तर 15 जण जखमी झाले होते.
पुणे-नाशिक हा 210 किलोमीटरच्या मार्गावरील हा पहिलाच अपघात नाही. याआधी अनेक अपघात झाले, ज्यात शेकडो प्रवाशांचे जीव गेले. त्यामुळे या मार्गाचं चौपदरीकरण करण्याची मागणी होत होती. त्यालाच अनुसरून या मार्गाचं साडे सहा वर्षांपासून काम सुरु आहे. बऱ्याच अंशी या मार्गाचं काम पूर्ण झालंय, मात्र अद्यापही काही गावांत रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही, तर काही ठिकाणी एक पदरी मार्ग आहे.
या सर्व परिस्थितीत वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागतोय तो वेगळाच, मात्र टोलवसुलीही केली जात आहे. त्यामुळे मनसेने आक्रमक होत काल टोलवसुली बंद पाडली होती.
टोलनाक्यावर राडा, मनसे आमदार शरद सोनवणेंवर गुन्हा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Jul 2018 08:02 PM (IST)
जुन्नरचे मनसे आमदार शरद सोनवणे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झालाय. चाळकवाडी टोलनाक्याच्या व्यवस्थापनाने आळे फाटा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -