Euro 2020 Semifinal : युरो चषकातील पहिल्या उपांत्य सामन्यात इटलीनं स्पेनचा पेनल्टी शूटआऊटवर पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला. युरो चषकाची फायनल गाठण्याची इटलीची ही आजवरची चौथी वेळ ठरली. चुरशीच्या झालेल्या या सामन्यात निर्धारित वेळेत दोन्ही संघांनी प्रत्येकी एकेका गोलची नोंद केली. इटलीकडून चिएसानं 60व्या मिनिटाला गोल डागला. तर स्पेनच्या मोरोटानं 80व्या मिनिटाला गोल करून बरोबरी साधली. त्यानंतर अतिरिक्त वेळेत सामना बरोबरीत सुटल्यानं या स्पर्धेत तिसऱ्यांदा पेनल्टी शूटआऊटवर निकाल देण्याची वेळ आली. ज्यात इटलीनं 4-2 अशी बाजी मारली. दरम्यान अंतिम फेरीत इटलीसमोर आता इंग्लंड आणि डेन्मार्क सामन्यातल्या विजेत्या संघाचं आव्हान असणार आहे.
पहिल्या सत्रात दोन्ही संघांच्या पदरी निराशाच आली. अटीतटीच्या सामन्यात पहिल्या सत्रात दोघांपैकी कोणत्याही संघाला गोल डागता आला नाही. मात्र दुसऱ्या सत्रात इटलीचा संघ काहीशी आक्रमक खेळी करताना दिसला. इटलीनं 60व्या मिनिटाला गोल डागत 1-0 अशी आघाडी घेतली. इटलीच्या फेडरिको चिसानं संघाला ही आघाडी मिळवून दिली. त्यानंतर स्पेनचा संघ काहीसा दडपणाखाली आला. अशातच स्पेनच्या अलवारो मोराटाने 80व्या मिनिटाला गोल करून सामना बरोबरीला आणला. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक गोल डागल्यामुळे सामना बरोबरीला आला होता. उर्वरित वेळेत अटीतटीची लढत पाहायला मिळाली. दोन्ही संघांकडून सामन्यात आघाडी घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु होते. मात्र सामना बरोबरीत सुटल्यानं या स्पर्धेत तिसऱ्यांदा पेनल्टी शूटआऊटचा थरार रंगला.
घातक आणि विजयासाठी आक्रमक झालेला इटलीचा संघ स्पेनसाठी बऱ्याचदा डोकेदुखी ठरला आहे. या सामन्यातही असंच काहीसं पाहायला मिळालं. पेनल्टी शूटआउटमध्ये इटलीनं 4-2 अशी बाजी मारली. परिणामी स्पेनला पराभवाचा सामना करावा लागला. स्पेनच्या पराभवासोबतच इटलीनं युरो चषकातील अंतिम सामन्याचं तिकीट निश्चित केलं.
साखळी फेरीत इटलीने टर्की, स्वित्झर्लंड आणि वेल्सला पराभूत करत बाद फेरीत धडक मारली होती. त्यानंतर बाद फेरीत ऑस्ट्रियाचा 2-1 ने पराभव केला होता. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत बेल्जियमचा 2-1 ने धुव्वा उडवला. आता उपांत्य फेरीत स्पेनला पराभूत करत इटलीने अंतिम फेरीत धडक मारली आहे. अंतिम फेरीत इटलीसमोर आता इंग्लंड आणि डेन्मार्क सामन्यातल्या विजेत्या संघाचं आव्हान असणार आहे.