Commonwealth Games 2022: बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेच्या पहिल्या सुवर्णपदकावर इंग्लंडनं नाव कोरलं आहे. पुरुषांच्या ट्रायथलॉनमध्ये पहिल्या दिवशी इंग्लंडच्या अॅलेक्स यीनं (Alex Yee) दमदार प्रदर्शन करून सुवर्णपदक जिकलं. महत्वाचं म्हणजे, गेल्या वर्षी पार पडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत अॅलेक्सचं थोडक्यात सुवर्णपदक हुकलं होतं. त्यावेळी त्याला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं होतं. मात्र, त्यानं जिद्द सोडली नाही आणि बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून आपल्या देशाचा झेंडा फडकावला. 


अॅलेक्सनं ट्रायथलॉन शर्यत पूर्ण करण्यासाठी 50 मिनिटे 34 सेकंदाची वेळ नोंदवली. त्यानं आपला प्रतिस्पर्धी न्यूझीलंडच्या हेडन वाइल्डला 13 सेकंदांनी मागं टाकलं. ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू हाऊसर तिसर्‍या स्थानावर असताना त्यानं ट्रायथलॉन 50 मिनिटे 18 सेकंदात शर्यत पूर्ण केली. न्यूझीलंडच्या हेडनला ही शर्यत जिंकता आली असती, पण 10 सेकंदाच्या पेनल्टीमुळं तो अॅलेक्सच्या मागे पडला. ट्रायथलॉन खेळात तीन प्रकार असतात.ज्यात खेळाडूंना पोहल्यानंतर सायकलिंग आणि धावण्याची शर्यत पूर्ण करावी लागते. या खेळाच्या तिन्ही प्रकारात कमी वेळत शर्यंत पूर्ण करणाऱ्या खेळाडूला विजेता घोषीत केलं जातं.


अॅलेक्सची प्रतिक्रिया
कॉमनवेल्थ स्पर्धेत पहिलं सुवर्णरपदक जिंकल्‍यानंतर अॅलेक्‍सने ही आपली आजपर्यंतची सर्वात मोठी कामगिरी असल्‍याचे वर्णन केलंय. एखाद्या मोठ्या क्रीडा स्पर्धेत आई-वडिलांसमोर धावण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं त्यानं सांगितलं. सुवर्णपदक जिंकल्यानंतर अॅलेक्स म्हणाला की "मी खूप आनंदी आहे, ही माझी पहिलीच कॉमनवेल्थ स्पर्धा आहे. मला या शर्यतीत शक्य तितके शांत राहायचं होतं आणि इतरांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी स्वतःवर लक्ष केंद्रित करायचं होतं. देशासाठी सुवर्णपदक जिंकलं, यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजतो."


पदतालिकेत ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर
कॉमनवेल्थ स्पर्धेच्या पहिल्या दिवशी 16 सुवर्ण पदकांसह 48 पदके पणाला लागली होती. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियानं 8 सुवर्णांसह 16 पदके जिंकली आहेत. ऑस्ट्रेलिया सध्या पदकतालिकेत अव्वल स्थानावर आहे. यजमान इंग्लंड दोन सुवर्ण आणि एकूण 9 पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे.


हे देखील वाचा-