Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबाबत (Governor Bhagat Singh Koshyari remark on Mumbai) केलेल्या वक्तव्याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात विरोधक आक्रमक झाले असताना शिंदे गटाने राज्यपालांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. राज्यपालांविरोधात केंद्र सरकारकडे तक्रार करणार असल्याचे शिंदे गटाचे प्रवक्त दीपक केसरकर (Deepak Kesarkar)यांनी केली. राज्यपालांनी केलेले वक्तव्य हे राज्याचे अपमान करणारे आहे, असेही त्यांनी सांगितले. 


शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी सांगितले की, राज्यपाल घटनात्मक पद आहे. त्यामुळे कोश्यारी यांच्याकडून यापुढे अशी विधाने येणार नाही अशी सूचना केंद्राने द्यावी, असेही केसरकरने म्हटले.  मुंबईच्या उभारणीत सगळ्याच समाजाचा वाटा आहे. मात्र, त्यातही मोठा वाटा मराठी माणसांचा आहे. मुंबईतील औद्योगिक उभारणीत मुंबईच्या उभारणीत पारशी समुदायाचे मोठं योगदान आहे. 


एखाद्या समाजाच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर त्या समाजाने पैसा काढला की मुंबईत काही राहणार नाही असे वक्तव्य म्हणजे राज्यपालांचा मुंबईबाबतचा अभ्यास कमी आहे, याचे द्योतक असल्याचे केसरकर यांनी म्हटले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दौऱ्यावरून मुंबईत आल्यानंतर सगळे आमदार त्यांना भेटणार आहोत. राज्याच्या भावना राज्यपालांनी जपल्या पाहिजेत. राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यावर मराठी माणसाची भावना केंद्र सरकारला कळवावी यासाठी मुख्यमंत्र्यांना आग्रह धरणार असल्याचे केसरकर यांनी म्हटले. 


राज्यपाल कोश्यारी यांनी काय म्हटले?


गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही असं वक्तव्य भगसिंह कोश्यारींनी केलं आहे. शुक्रवारी, मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात स्थानिक चौकाला दिवंगत श्रीमती शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. मुंबई, ठाणेच्या विकासात गुजराती, मारवाडी समाजाचे मोठं योगदान आहे. 


राज्याचा राज्यपाल त्याच राज्याच्या जनतेची बदनामी करतो हे भयंकर 


राज्याचा राज्यपाल त्याच राज्याच्या जनतेची बदनामी करतो हे भयंकर आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिली. गुजराती राजस्थानी हा विषय राहू द्या यांनाच सर्वात आधी नारळ दिला पाहिजे. यांच्या कारकिर्दीत राज्यपाल या संस्थेचा व महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेचा स्तर तर खालावला आहेच, पण महाराष्ट्राचा अवमानही सातत्याने झाला असल्याची टीका सावंत यांनी केली आहे.


महाराष्ट्र आणि मुंबईतील माणूस कर्तबगार आणि सक्षम


राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्र आणि मुंबईतील माणूस कर्तबगार आणि सक्षम आहे. मराठी माणसाच्या जीवावर अनेक राज्य पोसल्या जातात. आम्ही चटणी भाकर खाऊन पोट भरून इतरांना पोसणारी इमानदार माणसे आहोत. आपण मराठी माणसाचा अपमान केलाय महाराष्ट्राची लवकरात लवकर माफी मागा, असं आमदार मिटकरींनी म्हटलं आहे.