Commonwealth Games 2022: कॉमनवेल्थ स्पर्धेच्या पदापर्णातच भारताची सर्वात युवा स्क्वॉशपटू अनहत सिंहनं (Anahat Singh) दार कामगिरी बजावून सर्वांना प्रभावित केलंय. महिला एकेरी स्क्वॉश स्पर्धेत अनहत सिंहनं अंतिम 64 मध्ये सेंट व्हिसेंट व ग्रेनेडाइंसची जाडा रॉसला 11-5, 11-2, 11-0 असं पराभूत करून एकतर्फी विजय मिळवला. या विजयासह अनहतनं स्क्वॉश महिला एकेरीच्या अव्वल 32 मध्ये प्रवेश केलाय. अनहत प्रथमच वरिष्ठ स्तरावर खेळत आहे. यापूर्वी तिनं ज्युनियर स्तरावरील राष्ट्रीय स्पर्धांमध्येही सहभाग घेतलाय. दरम्यान, 15 वर्षांखालील स्तरावर केलेल्या दमदार कामगिरीनंतर अनहतची भारतीय संघात निवड झाली. ती यावर्षी आशियाई ज्युनियर स्क्वॉश आणि जर्मन ओपनची चॅम्पियन ठरलीय.
दिल्लीत जन्मलेल्या अनहत सिंगला स्क्वॅश खेळण्याची प्रेरणा मोठी बहीण अमीराकडून मिळाली. अमिरानं अंडर-19 मध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलंय. सध्या अमीरा यूके-हार्वर्ड विद्यापीठात पदवीचं शिक्षण घेत आहे. अमीरा हार्वर्ड महिला संघासाठी स्क्वॅश खेळते. अनाहत सिंहचे वडील गुरशरण सिंह हे वकील आहेत. तर, तिची आई व्यवसायानं इंटिरियर डिझायनर आहे.
अनहत सिंहनं काय म्हटलंय?
अनहत सिंहनं ईएसपीएनला सांगितले की,"सुरुवातीला मला अशा अनुभवी खेळाडूंसोबत शिबिरात राहण्याची काळजी वाटत होती. पण ते खरोखरच अप्रतिम आणि उपयुक्त ठरलं. त्यांनी मला योग्य प्रकारे फिट होण्यास मदत केली."अनहत अवघ्या सहा वर्षांची असताना तिनं बॅडमिंटन खेळण्यास सुरुवात केलीय. त्यावेळी अनहतची मोठी बहीण अमीरा सिरी फोर्टवर स्क्वॉश खेळायची. दोन वर्षांनंतर अनहत बॅडमिंटनऐवजी स्क्वॉश खेळण्याकडं वळली. "मी माझ्या बहिणीसोबत जायची आणि 15-20 मिनिटे हिट करायची, पण त्यावेळी मी या खेळाला गांभीर्यानं घेतलं नाही, कारण मी प्रामुख्यानं बॅडमिंटनवर लक्ष केंद्रित करत होते.परंतु, माझी बहीण बंगालमध्ये एक स्पर्धा खेळत होती आणि मी तिच्यासोबत गेली होती. त्यानंतर हळूहळू मलाही स्कॉश खेळण्याची आवड निर्माण झाली आणि मी सरावाला सुरुवात केली", असं अनहत सिंहनं म्हटलं.
अनहतनं जिंकलेले खिताब
अनहतनं खूप कमी कालावधीत 46 राष्ट्रीय सर्किट खिताब, दोन नॅशनल सर्किट खिताब, दोन नॅशनल चॅम्पियनशिप आणि आठ आंतरराष्ट्रीय खिताब जिंकले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर तिनं ब्रिटीश ज्युनियर स्क्वॉश ओपन (2019) आणि यूएस ज्युनियर स्क्वॉश ओपनचं (2021) खिताब जिंकलं आहे. स्क्वॅश हा भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ नाही, पण अनाहताने हा खेळ लोकप्रिय करण्याचा निर्धार केलाय.
हे देखील वाचा-