कार्डिफ : दुसऱ्या टी-20 सामन्यात इंग्लंडने भारताचा पराभव करत मालिकेत 1-1ने बरोबरी साधली आहे. अॅलेक्स हेसल्सच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडने दुसरा सामना पाच गडी राखून जिंकला आहे. भारताने इंग्लंडसमोर 149 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं.


अॅलेक्स हेल्सने इंग्लंडकडून 41 चेंडूत सर्वाधिक 58 धावा केल्या. याशिवाय जॉनी बेअर्सटोनेही 28 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.


नाणेफेक जिंकत इंग्लंडने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर रोहित शर्मा अवघ्या 5 धावांवर बाद झाला. रोहितनंतर शिखर धवनही अवघ्या 10 धावांवर धावचित झाला. सामन्याच्या सुरुवातीलाच दोन विकेट गेल्यानंतर सावध खेळण्याची आवश्यकता असताना फटकेबाजी करण्याच्या नादात लोकेश राहुलही आपली विकेट देऊन बसला.


रोहित, शिखर आणि राहुल तंबूत परतल्यानंतर खेळायला आलेल्या विराट कोहली आणि सुरेश रैनाने संघाला सावरलं. कोहलीने सर्वाधिक 47 धावा केल्या. सुरेश रैनाने 27 आणि महेंद्रसिंग धोनीने 32 धावा केल्या. इंग्लंडच्या जेस बॉल, प्लंकेट, वाईली आणि आदिल रशीद या गोलंदाजांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.


भारतानं दिलेल्या 149 धावांचं लक्ष्य इंग्लंडने 19.4 षटकांमध्ये गाठलं. शेवटच्या क्षणी अटीतटीच्या झालेल्या सामन्यात इंग्लंडने बाजी मारली. भारताकडून उमेश यादवने 2 विकेट घेतल्या. तर भुवनेश्वर कुमार, यजुवेंद्र चहल आणि हार्दिक पांड्याने एक-एक विकेट घेतली. दुसरा सामना जिंकून इंग्लंडने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. त्यामुळे अखरेचा सामना निर्णायक ठरणार आहे.