पुणे : 'ज्ञानोबा-तुकोबा'च्या जयघोषात वारकरी मंडळी पालख्यांमध्ये सहभागी होत पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ होत आहेत. विठू नामाचा एकच गजर आळंदी आणि देहूतून निघालेल्या वारकऱ्यांकडून एकमुखानं गायला जात आहे.
संत तुकारामांची आणि ज्ञानेश्वर माऊलींची पालखी टाळ-मृदुंगाच्या तालात आणि विठूनामाच्या जयघोषात पंढरीच्या दिशेनं निघाली आहे.
हजारो दिंड्या या सोहळ्यात सहभागी होत आहेत. त्यातील मानाची दिंडी म्हणजे संत श्री ज्ञानोबा माऊलींची. ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज आळंदीहून निघेल आणि भवानी पेठेतल्या विठोबा मंदिरात मुक्कामी असेल.
संत तुकाराम महाराजांची पालखी आकुर्डीहून निघेल आणि नानापेठेतील श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरात मुक्कामी असेल. अशाप्रकारे या दोन्ही पालख्या आज पुणे शहरात दाखल होतील.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात महाराष्ट्रच्या विविध भागातून लाखो भाविक सहभागी होत असतात. या लाखोंच्या संख्येने असलेल्या गर्दीवर नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही. त्यामुळे चोरीच्या अनेक घटना घडतात.
एका खासगी बँकेने वारीदरम्यान आळंदी ते पंढरपूर या मार्गावर फिरते एटीएम ठेवले आहे. एटीएम सोबत असल्यामुळे वारकरीही अधिकचे पैसे जवळ न बाळगता गरजेपुरतेच पैसे जवळ ठेवत आहेत. या फिरत्या एटीएममुळे वारीत होणाऱ्या चोरीच्या घटनांना काही प्रमाणात आळा बसण्यास मदत होणार आहे.