मुंबई : काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या ‘संजू’ या सिनेमात रणबीर कपूरने साकारलेल्या संजय दत्तच्या भूमिकेची सर्वत्र प्रशंसा होत आहे. ‘संजू’चे दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी आज सिनेमाच्या मेकिंगचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

संजू हा सिनेमा तयार होण्यासाठी तब्बल दोन वर्ष लागली. हिरानी यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओत ‘संजू’चा सुरुवातीपासूनचा प्रवास दाखवण्यात आला आहे. सिनेमात संजय दत्तचे तारुण्यापासून ते 40 व्या वयापर्यंतचे वेगवेगळे लूक दाखवण्यात आले आहेत.

संजय दत्तची भूमिका साकारणं किती आव्हानात्मक होतं, हे या व्हिडीओतून रणबीर कपूर सांगताना दिसत आहे. “मी आतापर्यंतच्या कोणत्याही सिनेमातील भूमिकेसाठी माझ्या शरीरावर इतकी मेहनत घेतली नव्हती. ‘संजू’मध्ये मात्र मला शरीरावर मोठी मेहनत घ्यायला लागली. त्यामुळे मी या सिनेमाकडे चॅलेंज म्हणूनच पाहत होतो,” असं रणबीरने म्हटलं आहे.

दरम्यान, संजय दत्तचा एक लूक साकारण्यासाठी रणबीरने तब्बल 20 किलो वजन वाढवलं होतं. त्यानंतर पुन्हा तारुण्यातील संजय दत्त साकारण्यासाठी रणबीरला हे वजन कमी करावं लागलं होतं.



बॉक्स ऑफिसवर संजूची कमाल

‘संजू’ हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करत आहे. सिनेमाने रिलीज झाल्यानंतरच्या सात दिवसांत अनेक रेकॉर्ड्स तोडले आहेत. या सिनेमाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 34.75 कोटींचा गल्ला जमवत रिलीजच्या दिवशी सर्वाधिक कमाई करण्याचा यावर्षीचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

‘संजू’ सिनेमाने सात दिवसांत एकूण 202.51 कोटी रुपयांची कमाई केली आहे.