मुंबई : टीम इंडियाचा ऑलराऊंडर खेळाडू हार्दिक पांड्याने दुखापतीतून सावरल्यानंतर दमदार वापसी केली आहे. हार्दिक पांड्याने डीवाय पाटील टी-20 चषक स्पर्धेत धमाकेदार शतक ठोकलं आणि पाच विकेट्सही घेतल्या. या खेळीसह हार्दिकने भारतीय संघात पुनरागमनाचे संकेत दिले आहे.


हार्दिक पांड्याने रिलायन्स वनकडून खेळताना 39 चेंडूत 105 धावा ठोकल्या. हार्दिकने अवघ्या 37 चेंडूत आपलं शतक साजरं केलं. हार्दिकने त्याच्या खेळीमध्ये 10 षटकार आणि 8 चौकार लगावले. हार्दिकच्या याच खेळीच्या जीवावर रिलायन्स वनने प्रतिस्पर्धी नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (कॅग) संघापुढे 252 धावांचा डोंगर उभा केला. या लक्ष्याचा पाठलाग करताना नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (कॅग) संघाला अवघ्या 151 धावा करता आल्या. हार्दिकची बॅट जशी मैदनात तळपली तशी बॉलिंगमध्ये त्याने कमाल दाखवत पाच विकेट्स घेतल्या.





हार्दिक गेल्या पाच महिन्यांपासून कमरेच्या दुखापतीमुळे क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. कमरेच्या शस्त्रक्रियेसाठी हार्दिकला लंडनलाही जावं लागलं होतं. दुखापतीतून सावरल्यानंतर आता हार्दिक टीम इंडियामध्ये कम बॅक करण्यास सज्ज झाला आहे. सामना संपल्यानंतर बोलताना हार्दिकने म्हटलं की, गेल्या सहा महिन्यापासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. ज्याप्रकारे आजचा सामना झाला, त्यामुळे मी खूप आनंदी आहे. स्वत:ला पारखण्यासाठी हे उत्तम व्यासपीठ आहे.


हार्दिक पांड्याचं या सामन्यानंतर भारतीय संघात लवकरच पुनरागमन होण्याची शक्यता आहे. कारण या सामन्याला पाहण्यासाठी निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद हे देखील डीवाय पाटील स्टेडियममध्ये उपस्थित होते. हार्दिकच्या या खेळीची सोशल मीडियावरही जोरदार चर्चा आहे. त्यामुळे क्रिकेट चाहतेही हार्दिकला लवकरच टीम इंडियामध्ये पाहण्यास उत्सुक आहेत.


इतर बातम्या


हार्दिक-नताशाच्या साखरपुड्याच्या बातमीने धक्का बसला : हार्दिकचे वडील


हार्दिक पंड्याला क्लिन बोल्ड करणारी 'नताशा' आहे तरी कोण?


'कॉफी विथ करण'मध्ये महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, हार्दिक-राहुलला प्रत्येकी 20 लाखांचा दंड


Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 04 मार्च 2020 | बुधवार | ABP Majha