मुंबई : भारताचा क्रिकेटपटू हार्दिक पांड्यासाठी 2020 ची सुरुवात अतिशय खास ठरली. पांड्याने सर्बियन मॉडेल नताशा स्टॅनकोविकसोबत साखरपुडा केला. हार्दिक आणि नताशाच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान शेअर झाले. या जोडप्याने आपापल्या सोशल मीडिया अकाऊंटवर साखरपुड्याचे फोटो चाहत्यांसाठी शेअर केले. साखरपुड्यानंतर पांड्या कुटुंबाने दोघांचं अभिनंदन केलं. पण त्यांच्या साखरपुड्याबाबत हार्दिकच्या कुटुंबीयांना कोणतीही कल्पना नव्हती.


हार्दिकचे वडील हिमांशु पांड्या यांनी सांगितलं की, "साखरपुड्याची बातमी ऐकून आम्हाला धक्का बसला होता. नताशा अतिशय चांगली मुलगी आहे आणि आम्ही मुंबईत अनेक वेळा तिला भेटलो आहोत. दोघे सुट्टीसाठी दुबईला जाणार असल्याचं आम्हाला माहित होतं. पण ते साखरपुडा करतील याची आम्हाला जराही कल्पना नव्हती. साखरपुड्याच्या बातमीने आम्हाला धक्का बसला. साखरपुड्याबाबत आम्हाला नंतर समजलं. लग्नाची तारीख अद्याप ठरवलेली नाही. लवकरच यावर निर्णय घेऊ."


हार्दिक पंड्याला क्लिन बोल्ड करणारी 'नताशा' आहे तरी कोण?


हार्दिक पांड्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करुन साखरपुड्याबाबत सांगितलं होतं. दुबईमध्ये हार्दिक पांड्या एका स्पीडबोटवर गुडघ्यावर बसून गर्लफ्रेण्ड नताशाला प्रपोज करताना दिसत आहे. या प्रसंगाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना हार्दिक पांड्याने लिहिलं आहे की, "मैं तेरा, तू मेरी जाने सारा हिंदुस्तान।' 01.01.2020 #engaged" या पोस्टनंतर लगेचच त्याच्या सहकाऱ्यांनी, मित्रमंडळींनी आणि चाहत्यांनी या जोडप्याला शुभेच्छा देण्यास सुरुवात केली.





हार्दिकचा भाऊ कृणाल पांड्यानेही नताशाचं कुटुंबात स्वागत केलं. त्याने ट्विटरवर एक फोटो शेअर करताना नताशासाठी एक सुंदर पोस्ट लिहिली आहे. "हार्दिक पांड्या आणि नताशाला खूप खूप शुभेच्छा. नताशा, आमच्या क्रेझी फॅमिलीमध्ये तू सामील झाल्याने आम्ही अतिशय खूश आहोत. वेडेपणात तुझं स्वागत आहे. तुम्हा दोघांना खूप सारं प्रेम"