Dinesh Karthik Blessed with Two Baby Boys: भारतीय क्रिकेट संघाचा विकेटकीपर फलंदाज  दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) काल बापमाणूस झाला. त्याची पत्नी दीपिका पल्लिकल (Dipika Pallikal)नं काल जुळ्या मुलांना जन्म दिला. दिनेश कार्तिकनं सोशल मीडियावरुन याबाबत माहिती दिली. सोबतच आपली पत्नी आणि मुलांसोबतचा फोटो देखील त्यानं शेअर केला आहे. दिनेश कार्तिकची पत्नी दीपिका स्क्वॅश प्लेअर आहे.






दिनेश कार्तिकनं सोशल मीडियावर जुळ्या मुलांसह त्याचा आणि पत्नी दीपिका पल्लिकलचा फोटो शेअर केला आहे. सोबत त्याचा डॉगी देखील आहे. त्यानं फोटो शेअर करत म्हटलं आहे की आम्ही तीनचे चार झालो आहोत.  कार्तिकनं आपल्या दोन्ही मुलांची नावं देखील जाहीर केली आहेत.  कार्तिकनं एका मुलाचं नाव कबीर पल्लिकल कार्तिक (Kabir Pallikal Karthik) आणि दुसऱ्या मुलाचं नाव जियान पल्लिकल कार्तिक (Zian Pallikal Karthik) असं ठेवलं आहे. दोन्ही मुलांच्या नावानंतर दोघांची आडनावं लावली आहेत.  दिनेश फोटो पोस्ट करताना दोन्ही मुलांचे चेहरे दिसणार नाहीत याची काळजी घेतली आहे.


कोलकाताच्या संघाकडून अभिनंदन 


दिनेश कार्तिक बाबा झाल्यानंतर तो खेळत असलेली आयपीएल टीम कोलकाता नाइट राइडर्सनं ट्वीट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. केकेआरनं लिहिलं आहे की, "दिनेश कार्तिक आणि दीपिका पल्लीकल यांना जुळी मुलं झाली आहे. आई-वडिल झाल्याबद्दल दोघांना खूप शुभेच्छा. आमचा नाइट राइडर्स  परिवार आणखी मोठा झाला आहे. 
 
2015 मध्ये केला होता विवाह
 दीपिका पल्लीकल ही दिनेश कार्तिकची दुसरी पत्नी आहे. ती स्वत: स्क्वॅश प्लेअर आहे. कार्तिकनं पहिल्या पत्नीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर दीपिकाशी लग्न केलं होतं.  कार्तिकनं 2004 मध्ये टीम इंडियामध्ये पदार्पण केलं होतं.