नवी दिल्लीः भारत विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात 11 जूनपासून एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. मात्र त्यापूर्वी धोनीच्या कर्णधारपदावरुन चर्चेला उधाण आलं आहे. भारतीय संघाचे माजी संचालक रवी शास्त्री यांनी नुकतच सर्व प्रकारच्या कर्णधारपदासाठी विराट कोहलीच्या नावाचं समर्थन केलं आहे. त्यामुळे धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाला एक पराभव पत्करावा लागला तरी धोनीच्या नेतृत्वावर अनेक प्रश्नचिन्ह उभे केले जातील, असं क्रिकेट तज्ञांचं म्हणणं आहे.
त्यामुळे झिम्बाब्वे दौऱ्यानंतर धोनीचाही गांगुली होणार का, या चर्चेने आता जोर धरला आहे. कारण भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या करिअरमध्ये झिम्बाब्वे दौरा हा त्याचा कर्णधार म्हणून शेवटचा दौरा ठरला होता. त्यावेळी देखील संघाच्या प्रशिक्षकांनी कर्णधार बदलण्याची शिफारस केली होती.
धोनी आणि आणि गांगुली यांच्यातील साम्य
सौरव गांगुली कर्णधार असताना संघाची परिस्थिती अशीच काहीशी होती. गांगुलीच्या नेतृत्वाखाली 2005 मध्ये भारताने 2 कसोटी आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली होती. पण भारताचे तत्कालिन प्रशिक्षक ग्रेग चॅपेल आणि सौरव गांगुली यांचा ताळमेळ फारसा चांगला नव्हता. त्यामुळे चॅपेल यांनी गांगुलीला कर्णधारपद सोडून देण्याचा सल्ला दिला होता. गांगुलीने झिम्बाब्वे दौऱ्यात पहिल्याच सामन्यात शतक झळाकावून चॅपल यांना चांगलच उत्तर दिलं होतं. शिवाय दोन्ही मालिका आपल्या नावावर केल्या होत्या.
प्रशिक्षक चॅपेल यांनी भारतात परत आल्यानंतर बीसीसीआयला मेल करुन एक शिफारस केली, ज्यामुळे क्रिकेट विश्वात एकच खळबळ माजली होती. चॅपेल यांच्या शिफारशीनंतर गांगुलीला कर्णधारपदावरुन हटवण्यात आलं आणि राहुल द्रविडकडे कर्णधारपदाची धुरा देण्यात आली होती.
भारताचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी याची सध्याची परिस्थिती देखील गांगुलीच्या झिम्बाब्वे दौऱ्याप्रमाणेच आहे. संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी धोनी ऐवजी विराट कोहलीला सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये कर्णधार करण्याची मागणी केली आहे. शास्त्री यांनी धोनीला खेळाचा आनंद घेण्याचा सल्ला दिला आहे.
धोनीने आगामी दौऱ्यात चांगलं प्रदर्शन न केल्यास बीसीसीआयला धोनीला कर्णधारपदावरुन दूर करण्यासाठी चांगलं कारण मिळू शकतं, असं क्रिकेट तज्ञांचं म्हणणं आहे.