पुणे : दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यामधे प्रति लिटर पाच रुपये अनुदान जमा करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारपासून (16 जुलै) राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे. मात्र या आंदोलनाला रविवार संध्याकाळपासूनच सुरुवात होण्याची शक्यता आहे.


दूध उत्पादकांना सावरण्यासाठी प्रतिलिटर पाच रुपये सरकारला देणं शक्य आहे. गोवा, कर्नाटक सरकार अशी मदत करतं. त्यामुळे महाराष्ट्र सरकारनंही तशी मदत करावी, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं म्हणणं आहे.

राजू शेट्टी रविवारी संध्याकाळी पंढरपूरमधे असणार आहेत. तिथून रात्रीचा प्रवास करुन ते पालघर जिल्ह्यातील गुजरातच्या सीमेवर पोहचणार आहेत. तिथे राजू शेट्टी स्वत: आंदोलनात सहभागी होतील असं सांगण्यात आलं आहे.

पाच रुपयांच्या अनुदानाची ही मागणी गाईच्या दुधासाठी असुन दररोज अतिरिक्त ठरणारं चाळीस लाख लिटर गाईच दुध सराकरने सत्तावीस रुपये प्रति लिटर दराने खरेदी करण्याची मागणीही स्वाभिमानीकडून करण्यात आली आहे.

या आंदोलनातून मुंबईईला होणारा दूध पुरवठा रोखण्याचा स्वाभिमानीचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे रविवारी मध्यरात्रीपासून मुंबईची दूधकोंडी होण्याची शक्यता आहे.

तसेच, पोलिसांनी बळाचा वापर करुन हे आंदोलन मोडीत काढण्याच प्रयत्न केला, तर सहन करणार नाही, असंही शेट्टी म्हणाले.

किसान सभेचाही राजू शेट्टींच्या आंदोलनाला पाठिंबा

दूध संकलन आणि वितरण प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार असून यामध्ये मुख्यमंत्र्यापासून अनेक अधिकाऱ्यांचा सुद्धा सहभाग असल्याचा गंभीर आरोप किसन सभेचे नेते अजित नवले यांनी आज नाशिकमध्ये केला आहे. अखिल भारतीय किसान सभा आणि दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने या आंदोलनास आपला पाठिंबा आज जाहीर केला आहे.