नवी दिल्ली : भारताचा डबल ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान सुशील कुमार 2018 सालच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरला. पण त्याच सुशील कुमारच्या समर्थकांनी प्रतिस्पर्धी पैलवान प्रवीण राणाच्या समर्थकांवर हल्ला करुन, त्याच्या कामगिरीला गालबोट लावलं.


दिल्लीच्या के डी जाधव इनडोअर स्टेडियमवर आयोजित राष्ट्रीय कुस्ती निवड चाचणीदरम्यान ही घटना घडली.

सुशील कुमार आणि त्याच्या समर्थकांच्या दाव्यानुसार, राणाने कुस्ती सुरु असताना त्याच्या डोक्यावर मारलं. तसंच हाताचा चावा घेतला. त्यावरुनच दोघांच्या समर्थकांमध्ये हाणामारीला तोंड फुटलं.



सुशील कुमार म्हणाला की, "त्याने मला मारलं, पण काही हरकत नाही. मला चांगलं खेळण्यापासून परावृत्त करण्याची त्याची रणनीती असावी. हा खेळाचा एक भाग आहे. जे काही झालं ते चुकीचं होतं. मी याचा निषेध व्यक्त करतो. सामना संपल्यानतंर आमच्या मनात एकमेकांबद्दल आदर होता."

या विधानानंतरच दोन्ही पैलावानांचे समर्थक भिडले. दरम्यान सुशीलकुमार आणि प्रवीण राणा यांच्यातील  वैर जुनं आहे.

"सुशील कुमार समर्थकांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली. तसंच आगामी प्रो कुस्ती लीगमध्ये न खेळण्याची धमकीही दिली," असा आरोप प्रवीण राणाने केला आहे. "इतकंच नाही तर सुशीलच्या समर्थकांनी रिंगमध्ये त्याच्याविरोधात उरतल्याने मला आणि माझ्या मोठ्या भावाला मारलं," असा दावाही राणाने केला आहे.