आयपीएलमध्ये सुरुवातीच्या चार सामन्यानंतरच दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या फ्रँचायझींना मोठा धक्का बसला आहे. दिल्लीचा लेग स्पिनर अमित मिश्रा आणि हैदराबादचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला दुखापतीमुळे आयपीएलच्या उर्वरित सामन्यांना मुकावं लागणार आहे. त्यामुळे या अव्वल गोलंदाजांच्या अनुपस्थितीत पुढच्या दहा सामन्यात खेळावं लागणार आहे.


दिल्लीच्या फिरकीची धार कमी होणार?


शनिवारी दिल्ली आणि कोलकाता संघांमधल्या सामन्यात अमित मिश्राच्या बोटाला दुखापत झाली होती. त्या सामन्यात मिश्राला केवळ दोनच षटकं गोलंदाजी करुन ड्रेसिंग रुममध्ये परतावं लागलं होतं. पण या दुखापतीमुळे मिश्राला आता उर्वरित मोसमात खेळता येणार नाही. अमित मिश्रानं यंदाच्या मोसमात तीन सामन्यात तीन विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे मिश्राच्या अनुपस्थितीत दिल्लीच्या फिरकीची धार कमी होणार का? हा प्रश्न आहे.


IPL 2020 : आयपीएलमधील आतापर्यंतचा सर्वोत्तम कॅच; मनीष पांडेच्या 'सुपरकॅच'चा व्हिडीओ व्हायरल


अमित मिश्राच्या स्पर्धेतून बाहेर जाण्यानं आता दिल्लीच्या फिरकीची धुरा अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विनवर असेल याशिवाय एस मिधुन, शुभमन सिंग आणि अंकित सोनी या फिरकी गोलंदाजांना संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.


सनरायझर्सची चिंता वाढली


आधीच यंदाच्या मोसमातल्या खराब सुरुवातीनंतर आता भुवनेश्वर कुमारच्या स्पर्धेतल्या एक्झिटमुळे सनरायझर्स हैदराबादची डोकेदुखी वाढली आहे. चेन्नईविरुद्धच्या सामन्यात 19 व्या षटकात गोलंदाजी करताना भुवीला हिप इन्ज्युरीला सामोरं जावं लागलं. त्यातही मैदानात प्रथमोपचार घेऊन दोन वेळा त्यानं गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. पण अखेर त्याला मैदान सोडावं लागलं. त्यामुळे आता अनुभवी भुवनेश्वरच्या अनुपस्थितीत कर्णधार डेव्हिड वॉर्नरला खलील अहमद, नटराजन, सिद्धार्थ कौल, संदीप शर्मा या युवा गोलंदाजांवर विश्वास दाखवावा लागणार आहे.