नवी दिल्ली : टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कुणाची वर्णी लागणार, याकडे अवघ्या क्रिकेटविश्वाचं लक्ष लागलं आहे. कर्णधार विराट कोहली भारतात आल्यानंतर त्याच्याशी चर्चा करुन प्रशिक्षकाचा निर्णय घेतला जाईल, असं काल क्रिकेट सल्लागार समितीचे सदस्य सौरव गांगुली यांनी सांगितलं.


यामध्ये आता नवा ट्वीस्ट आला आहे. कारण स्टार स्पोर्ट्सच्या वृत्तानुसार प्रशिक्षकाचं नाव आज (मंगळवार) संध्याकाळपर्यंत जाहीर करा, असे आदेश सुप्रीम कोर्ट नियुक्त बीसीसीआयच्या प्रशासक समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी दिले आहेत.

क्रिकेट सल्लागार समिती म्हणजे सीएसी, ज्यामध्ये सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा समावेश आहे. या सीएसीला आज संध्याकाळपर्यंत नाव घोषित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

‘आगामी श्रीलंका दौरा एवढंच आमच्या डोळ्यासमोर नाही. त्यामुळे प्रशिक्षक निवडीसाठी आम्हाला आणखी वेळ हवा असून बऱ्याच जणांशी चर्चाही बाकी आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीही भारतात परतल्यावर त्याच्याशी चर्चा केली जाईल. त्यांनतरच प्रशिक्षकाच्या नावाची घोषणा करु.’ असं गांगुलीने सांगितलं होतं.

टीम इंडियाचे माजी संचालक रवी शास्त्री, टीम इंडियाचा माजी फलंदाज वीरेंद्र सहवाग, इंग्लंडचे क्रिकेटर रिचर्ड पायबस, वेस्ट इंडिजचे फिल सिमन्स, ऑस्ट्रेलियन क्रिकेटर आणि श्रीलंकेचे माजी कोच टॉम मुडी आणि सध्याचे अफगाणिस्तान क्रिकेट टीमचे कोच लालचंद राजपूत यांच्या मुलाखती घेण्यात आल्या.

संबंधित बातमी :

विराटशी चर्चा करुन प्रशिक्षकाची घोषणा करु : सौरभ गांगुली


विराटच्या म्हणण्यानुसारच प्रशिक्षक निवडणार, मात्र 'या' दोन नावांचाच पर्याय!