केंद्र सरकारने अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेबाबत मोठे-मोठे दावे केले होते. भाविकांसाठी सुरक्षेच्या सर्व उपाययोजना केल्या असल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला होता. या यात्रेत 100 पेक्षा अधिक भाविकांना लक्ष्य केलं जाऊ शकतं, असं 25 जुलैच्या गुप्तचर यंत्रणांच्या अहवालात स्पष्टपणे सांगितलं होतं. तरीही सुरक्षेत हलगर्जीपणा करण्यात आला का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
दरम्यान अमरनाथ यात्रेला दहशतवाद्यांनी यापूर्वीही अनेकदा लक्ष्य केलेलं आहे. 2000 साली पहलगाम बेस कॅम्पवर झालेल्या भ्याड हल्ल्यात 30 भाविकांचा मृत्यू झाला होता. तर 60 पेक्षा अधिक भाविक जखमी झाले होते.
दहशतवाद्यांनी 2001 साली कॅम्पवर हँडग्रेनेड फेकले, ज्यामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला. तर 15 जण जखमी झाले होते. याच्या पुढील वर्षी म्हणजे जुलै 2002 साली दहशतवाद्यांनी भाविकांवर हँडग्रेनेड फेकले, ज्यामध्ये दोन भाविकांना प्राण गमवावे लागले, तर दोन जण जखमी झाले होते.
दहशतवाद्यांनी 6 ऑगस्ट 2002 रोजी भाविकांच्या कॅम्पवर हल्ला केला. ज्यामध्ये दहा जणांचा मृत्यू झाला, तर 30 जण जखमी झाले होते.
2006 साली पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी अमरनाथ यात्रेला लक्ष्य केलं. यामध्ये एका भाविकाचा मृत्यू झाला होता. तर यावेळी 7 जणांचा मृत्यू झाला आहे.
हल्ल्यानंतर गृहमंत्रालयाची तातडीची बैठक
अमरनाथ यात्रेतील भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 7 भाविकांचा मृत्यू झाला, तर 19 भाविक जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. शिवाय, गृहमंत्रालयाची टीमही आज अनंतनागला जाऊन सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करणार आहे.
अमरनाथ यात्रेतील भाविकांवर दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून, हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये कांवड यात्रेचीही सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
संबंधित बातम्या :