Hardik Pandya on Sai Sudharsan : उदयोन्मुख फलंदाज साई सुदर्शनने (Sai Sudharsan Debut) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आज (17 डिसेंबर) पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय क्रिकेट संघाकडून पदार्पण केले. साई सुदर्शन हा भारताचा उदयोन्मुख क्रिकेटपटू आहे. वयाच्या 22व्या वर्षी सुदर्शनला आंतरराष्ट्रीय कॅप मिळाली. भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा तो 400 वा खेळाडू आहे. साईने आपल्या पहिल्याच सामन्यात कोणतेही दडपण न घेता नाबाद 55 धावांची खेळी केली. अशी कामगिरी करणारा तो चौथा भारतीय सलामीवीर ठरला. 


तमिळनाडूस्थित असलेल्या साई सुदर्शनचे आई-वडील अॅथलिट आहेत. वडिलांनी दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळाडू म्हणून भाग घेतला आहे, तर आई उषा भारद्वाज तामिळनाडूकडून व्हॉलीबॉल खेळली आहे. सुदर्शनने अल्पावधीत आपली प्रतिभा सिद्ध केली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तामिळनाडूकडून खेळणारा साई सुदर्शन हा टॉप ऑर्डरचा फलंदाज आहे. 






आयपीएलमधून प्रसिद्धी मिळाली


2022 मध्ये IPL दरम्यान सुदर्शन पहिल्यांदा प्रसिद्धीच्या झोतात आला होता. गुजरात टायटन्सकडून खेळताना त्याने आयपीएलमध्ये प्रतिभा दाखवली. त्याने 5 सामन्यात एका अर्धशतकाच्या जोरावर 145 धावा केल्या होत्या. सुदर्शनची ही उत्कृष्ट प्रतिभा पाहून गुजरात टायटन्सने त्याला आयपीएल 2023 साठी कायम ठेवले. या डाव्या हाताच्या फलंदाजाने आयपीएलच्या 16व्या हंगामातही जबरदस्त कामगिरी केली.






आयपीएल फायनलमध्ये 96 धावांची इनिंग


IPL 2023 च्या फायनलमध्ये साई सुदर्शनने उत्कृष्ट खेळी खेळली. गुजरात टायटन्सकडून खेळताना त्याने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध कठीण परिस्थितीत 96 धावांची खेळी केली. संघ फायनल जिंकू शकला नसला तरी त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीबद्दल प्रशंसा झाली. या प्रतिभावान फलंदाज सुदर्शनने IPL 2023 मध्ये 8 सामन्यात 3 अर्धशतकांच्या मदतीने 362 धावा केल्या होत्या. या काळात त्याची फलंदाजीची सरासरी 51.71होती.


हार्दिक पांड्यानं केलेलं 'ते' भाकित तंतोतंत खरं ठरलं! 


देशांतर्गत क्रिकेटमध्ये तामिळनाडूकडून खेळणारा साई सुदर्शन प्रथमच आयपीएल 2022 मध्ये आयपीएलद्वारे प्रकाशझोतात आला. गुजरात टायटन्सकडून खेळताना त्याने गेल्या दोन मोसमात अनेक तुफानी खेळी खेळल्या. गुजरात टायटन्सचा माजी कर्णधार हार्दिक पांड्याने 7 महिन्यांपूर्वी साईबद्दल भाकीत केले होते की, तो भविष्यात चमकदार कामगिरी करेल


गुजरात टायटन्सचा माजी कर्णधार हार्दिक पांड्या म्हणाला होता की, साई सुदर्शन भारताचं नाव उंचावेल. यानंतर, आज 17 डिसेंबर 2023 रोजी साई सुदर्शनला भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी कर्णधार केएल राहुलने त्याला पदार्पणाची कॅप दिली. 


पाकिस्तानविरुद्ध शतके झळकावली


साई सुदर्शनने इमर्जिंग आशिया चषकात भारताकडून पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावले आहे. आशिया कपमध्ये त्याने 5 डावात 220 धावा केल्या होत्या. यामध्ये एक शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश होता. सुदर्शनने तामिळनाडू प्रीमियर लीगमध्येही आपली छाप सोडली आहे. TNPL 2021 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर होता. TNPL 2023 च्या लिलावात सुदर्शन सर्वात महाग विकला गेला.


इतर महत्वाच्या बातम्या