Yavatmal News :  पांढऱ्या सोन्याचा जिल्हा अशी यवतमाळ जिल्ह्याची (Yavatmal) ओळख आहे. मात्र,  नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचा कापूस ओला झाला आणि दर घसरला. कापसाचा एमएसपी (Cotton MSP Price) दर 7020 रुपये क्विंटल असून शेतकऱ्यांचा कापूस हा व्यापारी 6300 ते 6500 रुपये दराने खरेदी करीत आहे. अशातच मोजक्याच जिनिंग प्रेसिंग सुरू झाले. नाफेड आणि सीसीआयची खरेदीही जिल्ह्यात अद्यापही सुरू झाली नसल्याने शेतकऱ्यांच्या घरी कापूस पडून आहे. कापसाला भाव नसल्याने जवळपास 75 टक्के कापूस हा अजूनही शेतकऱ्यांच्या घरात असल्याचे म्हटले जात आहे. 


अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. काही पिकांचे नुकसान झाले तर हाताशी असलेल्या शेतमालाचा भावही घसरला. यवतमाळ जिल्ह्यात चार लाख हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड करण्यात आली. सुरुवातीला अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांचे मोठे नुकसान झाले. यातून वाचलेला कापूस आता निघणे सुरू असतानाच नोव्हेंबरमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना पुन्हा संकटाला समोर जावे लागले. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान तर झालेच मात्र कपाशीचे दर हे 1000 ते 1500 रुपये प्रतिक्विंटल मागे कमी झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. 


गतवर्षी 12 हजार रुपये क्विंटल दराने खरेदी होत असलेला कापूस यावर्षी केवळ 6500 हजार रुपये प्रति क्विंटलने व्यापारी खरेदी करीत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात शासनाने ठरवलेल्या एमएसपी दराप्रमाणे कापूस खरेदी करण्यासाठी पणन महासंघ आणि सीसीआयचे केंद्र सुरू करावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. या द्वारे खरेदी सुरू झाल्यास कापसाला भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे. पावसाचा पडलेला मोठा खंड त्यानंतर कापसावर आलेल्या लाल्या आणि मर रोगाचा प्रादुर्भाव यामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. उत्पादन खर्चही निघणार नसल्याने सरकारने शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे. 


कापसाला किमान 10 हजार रुपयांचा दर मिळावा ही मागणी


काही भागात कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यामुळं शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे. कपाशीचे अधिक नुकसान होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांकडून लवकरात लवकर वेचणी करण्यात आली असून यंदा कपाशीला चांगला भाव मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र सध्या कपाशीला कमी दर मिळत असून, उत्पादन खर्च निघत नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान कापसाला किमान दहा हजार क्विंटल तरी भाव मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.