Ishan Kishan : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियामध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. इशान किशनच्या जागी केएस भरतचा कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. ईशान किशनने या कसोटी मालिकेतून ब्रेक मागितला होता. त्यामुळे बीसीसीआयला हा बदल करावा लागला.
यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनने वैयक्तिक कारणांमुळे टीम इंडियातून ब्रेक मागितला होता, असे बीसीसीआयने म्हटले आहे. त्यामुळे त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी संघातून मुक्त करण्यात आले आहे. त्याच्या जागी यष्टिरक्षक केएस भरतचा समावेश करण्यात आला आहे. तो केएल राहुलसह विकेटकीपिंगचा पर्याय असेल.
दुसरीकडे, दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारतीय संघाला यापूर्वीच दोन मोठे झटके बसले आहेत. एकदिवसीय संघाचा भाग असलेल्या दीपक चहरने आपले नाव मागे घेतले आहे. कसोटी संघाचा भाग असलेला मोहम्मद शमी दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. कुटुंबातील वैद्यकीय समस्येमुळे दीपकने एकदिवसीय मालिकेतून आपले नाव मागे घेतले आहे. त्याच्या जागी निवड समितीने आकाश दीपची निवड केली आहे. शमीबाबत आधीच स्पष्ट करण्यात आले होते की, त्याचे खेळणे त्याच्या फिटनेसवर अवलंबून असेल.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दोन्ही गोलंदाजांची माहिती शेअर केली आहे. यापूर्वी दीपक चहर आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेतही भारतीय संघाचा भाग होता, परंतु तो एकही सामना खेळला नाही, तो टीम इंडियासोबत आफ्रिकेत आला नव्हता. आता त्याने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतूनही आपले नाव मागे घेतले आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीबाबत बीसीसीआयने सांगितले की, वैद्यकीय टीमने शमीचा फिटनेस स्पष्ट केलेला नाही, त्यामुळे तो 26 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे.
याशिवाय बीसीसीआयने सांगितले की, जोहान्सबर्ग येथे 17 डिसेंबर रोजी होणार्या पहिल्या वनडेनंतर फलंदाज श्रेयस अय्यर कसोटी मालिकेच्या तयारीसाठी कसोटी संघात सामील होईल. अय्यर दुसऱ्या आणि तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा भाग नसून तो आंतर-संघीय सामन्यात भाग घेईल.
इतर महत्वाच्या बातम्या