इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या मोसमात क्वालिफायर 2 चा सामना रविवारी रंगणार आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होईल. मुंबई इंडियन्सविरुद्ध क्वालिफायर वनमध्ये हार पत्करणारा दिल्ली कॅपिटल्स आज संघात मोठे बदल करू शकतो. दिल्ली कॅपिटल्सचा संघ नवीन सलामीच्या जोडीसह हैदराबादविरुद्ध मैदानात उतरू शकेल असा अंदाज वर्तविला जात आहे.
दिल्ली कॅपिटल्स संघासाठी सलामीवीर पृथ्वी शॉचा फॉर्म अद्याप चिंतेचा विषय बनला आहे. पृथ्वी शॉने आतापर्यंत खेळलेल्या 13 सामन्यांमध्ये 228 धावा केल्या आहेत. गेल्या 8 सामन्यात शॉचा फॉर्म खूपच खराब पाहायला मिळाला. यंदाच्या मोसमात त्याची सर्वोच्च धावसंख्या फक्त 19 धावा झाली आहे.
स्टोइनिसला सलामीची जबाबदारी मिळू शकते
शिखर धवनसोबत अजिंक्य रहाणेला सलामीला संधी मिळण्याची शक्यताही कमी आहे. कारण, तोही या मोसमात फ्लॉप ठरला आहे. स्टार अष्टपैलू मार्कस स्टोनिस या मोसमात चांगला फॉर्मात आहे, त्यामुळे आजच्या सामन्यात त्याला धवनबरोबर सलामीची जबाबदारी सोपविली जाण्याची शक्यता आहे.
DC vs SRH, Qualifier 2 : अंतिम फेरी कोण गाठणार? दिल्ली- हैदराबाद आज आमने-सामने
शिखर धवनबद्दल बोलायचे झाले तर तो या हंगामात दिल्ली कॅपिटल्सचा सर्वात यशस्वी फलंदाज आहे. आतापर्यंत त्याने दोन शतकांच्या मदतीने 525 धावा केल्या आहेत.
विजेता संघ मुंबई इंडियन्ससोबत भिडणार
आयपीएल 2020 मधील दुसरा क्वालिफायर सामना आज संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या सामन्यातील विजेता संघ आयपीएलच्या यंदाच्या सीझनच्या फायनल्समध्ये प्रवेश करणार आहे. 10 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या आयपीएल 2020च्या फायनल्समध्ये आज विजयी होणारा संघ मुंबई इंडियन्ससोबत भिडणार आहे.
आजच्या सामन्यासाठी संभाव्य संघ :
दिल्ली कॅपिटल्स : अजिंक्य रहाणे, शिखर धवन, श्रेयस अय्यर (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), शिमरन हेटमायर, मार्कस स्टोइनिस, अक्षर पटेल, आर अश्विन, हर्षल पटेल, एनरिक नॉर्टजे आणि कगीसो रबाडा.
सनरायझर्स हैदराबाद : डेविड वार्नर, श्रीवत्स गोस्वामी/रिद्धिमान साहा (विकेटकीपर), मनीष पांडे, केन विलियमसन, प्रियम गर्ग, जेसन होल्डर, अब्दुल समद, राशिद खान, शाहबज नदीम, टी नटराजन आणि संदीप शर्मा.