नवी दिल्ली: भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आज त्यांचा 93 वा वाढदिवस साजरा करत आहेत. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आडवाणी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांचे चरणस्पर्श करुन आशीर्वाद घेतले. त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा उपस्थित होते.





पंतप्रधानांनी आडवाणी यांना सोशल मीडियाच्या माध्यमातूनही शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी म्हटले आहे की, "भाजपला जनमानसात पोहचवण्यासोबतच देशाच्य़ा विकासात महत्वाची भूमिका निभावणाऱ्या आदरणीय लालकृष्ण आडवाणी यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा. ते पक्षाच्या कोट्यवधी कार्यकर्त्यांबरोबरच देशवासियांचेही प्रेरणास्त्रोत आहेत. मी त्यांच्या दीर्घ आणि निरोगी आरोग्यासाठी प्रार्थना करतो."





अमित शाहांनी आडवाणी यांना दिलेल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे की, आडवाणीनी त्यांच्या परिश्रम आणि निस्वार्थी सेवाभावाने केवळ देशाच्या विकासातच योगदान दिले नाही तर राष्ट्रवादी विचारधारेच्या विस्तारात प्रमुख भूमिका निभावली. जन्मदिनानिमित्त त्यांच्या दीर्घ आयुष्याची आणि निरोगी आरोग्याची ईश्वराकडे प्रार्थना करतो.





संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून आडवाणींना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, देशातील सर्वात सन्माननीय राजकारणी असलेल्या आडवाणींना शुभेच्छा. भाजपच्या रोपट्याचे आज वटवृक्ष झाले त्यात अटलजींच्या सोबत आडवाणींचे योगदान देशाला माहित आहे. ईश्वर त्यांना दीर्घायू आणि उत्तम स्वास्थ देवो.





लालकृष्ण आडवाणींचा जन्म 8 नोव्हेंबर 1927 साली कराची येथे झाला. त्यांनी अटल बिहारी वाजपेयींच्या मंत्रिमंडळात उपपंतप्रधान म्हणून कार्य केले. भाजपला सत्तेत आणण्यामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त देशातील प्रमुख नेत्यांनी आडवाणींना शुभेच्छा दिल्या आहेत.