नाशिक | जकार्ता एशियाडमध्ये भारताला क्वाड्रुपल स्कल्सचं सांघिक सुवर्णपदक मिळवून देणारा शिलेदार ही ओळख आहे भारताचा रोईंगपटू दत्तू भोकनळची.


हाच दत्तू भोकनळ आणि त्याचे सहकारी जकार्ता एशियाड गाजवून मुंबई विमानतळावर दाखल झाले, त्या वेळी सेनादलाच्या जवानांनी त्या रोईंग चमूचं वीरोचित स्वागत केलं होतं.

दत्तू भोकनळ आणि रोईंग चमूचं सेनादलाकडून स्वागत होण्याचं कारण रोईंगचा अख्खा संघ हा सेनादलाच्या सेवेत आहे. दस्तुरखुद्द दत्तू हा तर खडकीच्या बॉम्बे इंजिनीयरिंग ग्रुपचा जवान आहे. सेनादलाचा एक जवान म्हणून देशाच्या सीमेचं रक्षण आणि देशासाठी एशियाड-ऑलिम्पिक गाजवणं असं दुहेरी कर्तव्य तो मोठ्या निष्ठेनं बजावतो.

दत्तू भोकनळला लष्करातल्या याच कारकीर्दीनं आज आंतरराष्ट्रीय रोईंगपटू म्हणून देशात नवी ओळख मिळवून दिली आहे. पण दत्तूचं वैशिष्ट्य म्हणजे आपली नाळ ही काळ्या आईशी जुळलेली आहे, हे तो आजही विसरलेला नाही.

दत्तू हा मूळचा नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड तालुक्यातल्या तळेगावचा. लष्कराच्या सेवेतून आणि रोईंगच्या सरावातूनही छोटीशी सुट्टी मिळालेला दत्तू नुकताच कुठं गावी परतला आहे. खरं तर ही संधी त्याच्यासाठी भरपूर विश्रांती घेण्याची आहे. पण विश्रांती घेतोतो दत्तू कसला? गावी परतलेल्या दत्तूला तिथल्या दुष्काळी परिस्थितीनं पहिला धक्का दिला. शेतातला वाळलेला मका पाहून त्याची आणखी निराशा झाली. त्यानं परिस्थितीचं गांभीर्य ओळखून आपली सारी प्रतिष्ठा बाजूला ठेवली आणि  मक्याच्या सोंगणीसाठी त्यानंही कंबर कसली.

त्याविषयी दस्तुरखुद्द दत्तू भोकनळशी बातचीत केली असता, तो म्हणाला की, ज्या मातीत मी घडलो त्या मातीशी माझी नाळ अजूनही कायम आहे. त्यामुळं मातीत काम करताना मला कसलीही लाज वाटत नाही. सुट्टीसाठी घरी आलो, त्यावेळी घरची सारी मंडळीशेतात मका सोंगणीचं काम करत होती, मीही त्यांच्या कामाला हातभार लावला.

वास्तविक दत्तू भोकनळसाठी शेतात राबणं हे काही नवं नाही. लष्करात दाखल होण्याआधी तो शेतात मेहनत करूनच लहानाचा मोठा झाला. पण कर्तृत्वानं मोठा झाल्यावरही तो पुन्हा शेतीसाठी काबाडकष्ट करतो, याचा भोकनळ कुटुंबियांना अभिमान आहे.

दत्तूचे मामा भाऊसाहेब मत्सगर म्हणाले की, दत्तूचा आम्हाला अभिमान आहे. तो लहानपणापासूनच मोलमजुरी करत होता. त्याचे आईवडिलही लवकर वारले. तो स्वत:च्या मेहनतीनं आज खूप मोठा झाला आहे. तरी घरी आल्यावर शेतात कामं करतो. गावातल्यासारखा राहतो. प्रत्येकाशी आपुलकीनं बोलतो. त्याला कसलाही गर्व नाही.

दत्तूच्या वहिनी धनश्री भोकनळ यांनाही आपल्या दीराचा अभिमान वाटतो. धनश्रीताई म्हणाल्या की, दत्तू घरी आले त्या वेळी आम्ही मका सोंगण्याचं काम करत होतो. ते म्हणाले की मलाही मका सोंगायचं काम करायचंय. आम्ही नको म्हटलं तरीही त्यांनी शेतात येऊन काम केलं. ते अजूनही आपल्या मातीला विसरले नाहीत याचा आम्हाला अभिमान आहे.

भारताचे माजी पंतप्रधान लालबदाहूर शास्त्री यांनी १९६५ सालच्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या काळात देशवासियांना जय जवान जय किसान हा नारा दिला होता. देशाच्या सीमेचं रक्षण करणारा जवान आणि देशवासियांचं पोट भरणारा किसान यांची आठवण जागवणारा तो नारा आजही राष्ट्रभावनेचा सर्वोच्चबिंदू आहे. दत्तू भोकनळच्या पाठीवर शाबासकीची थाप ठोकताना आपण एकसूरात म्हणूया... जय जवान, जय किसान!