बीड : राजकीयदृष्ट्या नेहमी चर्चेत असणाऱ्या बीड जिल्ह्यातील आरोग्य स्थितीचं विदारक वास्तव एकाच महिन्यात दुसऱ्यांदा समोर आलंय. स्ट्रेचर नसल्याने महिलेला झोळी करुन रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच अशीच एक घटना पुन्हा समोर आली आहे. स्ट्रेचर उपलब्ध नसल्याने एका रुग्णाला झोळी करुन रुग्णालयात दाखल करावं लागलं.


बीड जिल्हा रुग्णालयात सुविधांचा अभाव असल्याचं वारंवार समोर येत आहे. महिन्याभरापूर्वीच एका महिलेला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करतेवेळी स्ट्रेचर उपलब्ध नसल्याने पांघरायची चादर झोळी म्हणून वापरण्याची वेळ नातेवाईकांवर आली. या घटनेला महिनाही उलटला नाही तर आज पुन्हा एकदा असाच प्रकार जिल्हा रुग्णालयात समोर आला.

महिनाभरापूर्वी बीड तालुक्यातील वडगाव येथील रुक्मिणी जाधव या महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल करतेवेळी स्ट्रेचर उपलब्ध झालं नाही. त्यामुळे रुग्णाच्या अंगावर पांघरलेली शाल झोळी म्हणून वापरण्याची वेळ नातेवाईकांवर आली. आज घडलेल्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाल्यामुळे प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.