मुंबई : भारतीय क्रिकेटचा उदयोन्मुख खेळाडू आणि यष्टीरक्षक रिषभ पंतने बुधवारी (16 जानेवारी) सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका फोटोमुळे खळबळ माजवली आहे. रिषभने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करुन चाहत्यांना त्याच्या गर्लफ्रेण्डची ओळख करुन दिली.


21 वर्षीय रिषभने शेअर केलेल्या फोटोमध्ये दिसणाऱ्या मुलीचं नाव इशा नेगी आहे. तिच्यासोबतचा फोटो शेअर करताना त्याने लिहिलं आहे की, "मला तुला आनंदी ठेवायचं आहे, कारण तुझ्यामुळेच मी एवढा आनंदी आहे."


इशा नेगी मूळची उत्तराखंडची आहे. तिच्या इन्स्टाग्रामवरील माहितीनुसार, ती इंटिरिअर डेकोर डिझायनर असून उद्योजिका आहे. ती अतिशय स्टायलिश आणि ग्लॅमरस आहे. तर रिषभ पंतचीही स्टायलिश खेळाडूंमध्ये गणना होते.

दुसरीकडे इशानेही तिच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर तोच फोटो पोस्ट करुन लिहिलं आहे की, "माय मॅन, माय सोलमेट, माय बेस्टफ्रेण्ड, द लव्ह ऑफ माय लाईफ रिषभ पंत."


ऑस्ट्रेलियामध्ये नुकतंच कसोटी मालिकेत खेळलेल्या रिषभ पंतचा न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे संघात समावेश झालेला नाही. त्यामुळे सध्या तो भारतात परतून कुटुंबीय आणि मित्रांसोबत वेळ घालवत आहे.

आतापर्यंत 9 कसोटी सामन्यात भारताचं प्रतिनिधित्त्व करणाऱ्या रिषभ पंतने 2 शतक आणि 2 अर्धशतक ठोकली आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याची कामगिरी चांगली होती. तो दहा टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळला असून 157 धावा केल्या आहेत.