WTC Final Scenario : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 च्या फायनलची शर्यत दिवसेंदिवस आता रंजक होत चालली आहे. महिनाभरापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलियाकडे सर्वांच्या नजरा होत्या, कारण दोन्ही संघांनी बराच काळ टॉप-2 स्थानांवर कब्जा केला होता. पण एका अपसेटनंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट्स टेबल (World Test Championship Points table 2023-2025) चे संपूर्ण गणित बिघडवलं आहे. आता भारत-ऑस्ट्रेलियासाठी फायनल खूप दूर वाटत आहे, पण एक संघ असा आहे ज्यांने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे.
भारत घसरला तिसऱ्या क्रमांकावर
न्यूझीलंडविरुद्ध 0-3 अशा पराभवानंतर टीम इंडियाला फायनलच्या शर्यतीतून बाहेर पडण्याचा धोका होता. पण पर्थ कसोटीतील विजयानंतर टीम इंडिया पुन्हा पहिल्या स्थानावर आली, मात्र ॲडलेड कसोटीतील पराभवामुळे टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर घसरली. ऑस्ट्रेलियाने 60.71 टक्के गुणांसह अव्वल स्थान पटकावले. पण 24 तासांनंतर मोठा अपसेट झाला आणि कांगारू टीम दुसऱ्या स्थानावर तर टीम इंडिया तिसऱ्या स्थानावर आली.
दक्षिण आफ्रिका एक पाऊल दूर
दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका 2-0 अशी जिंकली आणि अंतिम फेरीच्या अगदी जवळ आहे. दक्षिण आफ्रिका 10 सामन्यांनंतर 63.33 टक्के गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. त्यामुळे संघ अंतिम फेरीत पोहोचणार हे जवळपास निश्चित झाले आहे. आफ्रिकेचा संघ फायनलपासून फक्त 1 विजय दूर आहे आणि प्रोटीज संघाला डिसेंबरच्या अखेरीस त्यांच्याच घरी पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा वरचष्मा दिसत आहे.
टीम इंडियाला अंतिम फेरी गाठण्याची एकच संधी?
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारताला ऑस्ट्रेलियामध्ये उरलेल्या तीन टेस्ट मॅचमधून दोन विजय आणि एक ड्रॉ आवश्यक आहे. यामुळे त्यांची टक्केवारी 60.53% होईल आणि ते दक्षिण आफ्रिकेच्या मागे किमान दुसऱ्या क्रमांकावर असतील. आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेत 2-0 असा विजय मिळवला तरीही केवळ 57.02% पर्यंत पोहोचू शकतो.
जर भारताने मालिका 3-2 ने जिंकली तर त्यांची टक्केवारी 58.77% होईल आणि ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेला 1-0 ने पराभूत केले तरीही त्यांच्यापेक्षा कमी राहू शकेल. पण जर भारत 2-3 ने हरला तर त्यांची टक्केवारी 53.51% होईल.
अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका त्यांना मागे सोडू शकतात. या स्थितीत, भारताला पात्र होण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला पाकिस्तानविरुद्धच्या दोन्ही कसोटींमध्ये पराभव पत्करावा लागेल आणि ऑस्ट्रेलियाला श्रीलंकेत किमान सामना अनिर्णित राहावा अशी आशा आहे.