India vs Australia WTC final 2023: ज्याची भीती होती तेच झालं... कांगारूंचा हुकमी एक्का टीम इंडियावर भारी, दुसऱ्या दिवसाच्या खेळावर सर्वांची नजर
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 चा अंतिम सामना टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बुधवारपासून (7 जून) लंडनमधील ओव्हल येथे खेळवला जात आहे.
India vs Australia WTC final 2023 Day 2: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 चा (ICC World Test Championship Finals) अंतिम सामना टीम इंडिया (Team India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात बुधवारपासून (7 जून) लंडनमधील ओव्हल येथे खेळवला जात आहे. आज (8 जून) कसोटी सामन्याचा दुसरा दिवस असेल आणि ऑस्ट्रेलियन संघ 3 विकेट्सवर 327 धावांच्या पुढे खेळायला सुरुवात करेल. भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सामना सुरू होईल.
या विजेतेपदाच्या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघानं पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 3 गडी गमावून 327 धावा केल्या होत्या. संघाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ नाबाद 95 आणि ट्रॅव्हिस हेड 146 धावांवर नाबाद आहे. हे दोघंही दुसऱ्या दिवशीचा खेळ खेळायला सुरुवात करतील. कोणत्याही WTC फायनलमध्ये शतक झळकावणारा हेड हा पहिला खेळाडू ठरला आहे.
Stumps on the opening day of #WTC23 Final!
— BCCI (@BCCI) June 7, 2023
Australia ended Day 1 at 327/3.
See you tomorrow for Day 2 action.
Scorecard ▶️ https://t.co/0nYl21pwaw#TeamIndia pic.twitter.com/G0Lbyt17Bm
टीम इंडियानं सुरुवातीला केलेली पकड घट्ट, पण...
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील WTC अंतिम सामन्यात नाणेफेक टीम इंडियानं जिंकली. त्यानंतर सर्वात आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय टीम इंडियाचा कर्मणार रोहित शर्मानं घेतला. भारतीय कर्णधार रोहित शर्माचा विश्वास होता की, ओव्हलच्या खेळपट्टीवर गवत आहे, त्यामुळे वेगवान गोलंदाजांना याचा फायदा मिळू शकतो. अपेक्षेप्रमाणे सामन्याच्या सुरुवातीलाही असंच काहीसं घडलं. भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज, मोहम्मद शामी आणि शार्दुल ठाकूर यांनीही आपलं कौशल्य दाखवलं.
भारतीय गोलंदाजांनी केवळ 76 धावांत ऑस्ट्रेलियाच्या टॉप-3 फलंदाजांना आपली शिकार बनवलं होतं. डेव्हिड वॉर्नर (43), उस्मान ख्वाजा (0) आणि मार्नस लबुशेन (26) बाद झाले. सिराज, शामी आणि शार्दुल यांना 1-1 विकेट घेण्यात यश मिळाले होते. भारतीय संघ लवकरच सामन्यावर आपली पकड घट्ट करेल आणि कांगारूंचा स्कोअर 250 किंवा 300 धावांच्या आतच आपला गाशा गुंडाळेल असं वाटत होतं, पण तसं झालं नाही.
स्मिथ आणि हेडनं 251 धावांच्या पार्टनरशिपवर सामना फिरवला
क्रिजवर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव स्मिथ उभा होता. जणू तो काहीतरी मनाशी ठरवूनच आला होता. स्मिथचा ओव्हलवरचा आजवरचा रेकॉर्ड भारीच आहे, त्यात वादच नाही. कदाचित टीम इंडियानंही सामन्यापूर्वी कांगारुंच्या संघातील हुकमी एक्का स्टिव्ह स्मिथचा अभ्यास केला असेल. पण ही तयारी अजिबात कामी आली नाही. स्टिव्ह स्मिथला रोखण्यात रोहित सेनेतेल शिलेदार कमी पडले. आणि शेवटी ज्याची भिती होती तेच झालं. स्मिथनं आपल्या दमदार खेळीनं पहिल्या दिवसावर ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व कायम ठेवलं.
पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत स्मिथ आणि हेड यांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद 251 धावांची भागीदारी केली. अशा स्थितीत टीम इंडियाच्या गोलंदाजांना आणखी चांगल्या तयारीनं मैदानात उतरावं लागेल. यासोबतच विशेष रणनीतीही आखावी लागणार आहे. भारतीय चाहत्यांच्या नजरा आता दुसऱ्या दिवसाच्या खेळाकडे लागल्या आहेत. भारतीय गोलंदाजांनी झटपट विकेट घेतल्या आणि ऑस्ट्रेलियाला 450 धावांच्या आत थोपवलं तर टीम इंडियासाठी जेतेपदाचा मार्ग काहीसा सोपा असेल.
ओव्हलमध्ये स्टिव्ह स्मिथची सरासरी 97.75
WTC कसोटी सामन्यापूर्वी स्टिव्ह स्मिथनं ओव्हल स्टेडियमवर 3 कसोटी सामने खेळले होते, ज्यामध्ये त्यानं 97.75 च्या जोरदार सरासरीनं 391 धावा केल्या होत्या. त्यानं येथे (WTC Final) 5 डावांत 2 शतकं झळकावली. स्मिथचा येथे इतका मजबूत रेकॉर्ड आहे. आता WTC फायनलमध्येही त्यानं पहिल्या दिवशी नाबाद 95 धावांची खेळी खेळली आहे.
'द ओव्हल'मध्ये स्मिथचा रेकॉर्ड (WTC फायनलपूर्वी)
- एकूण कसोटी सामने : 3
- सरासरी: 97.75
- धावा : 391
- शतकं : 2
- अर्धशतकं : 2
WTC अंतिम सामन्यापूर्वी प्लेइंग-11
टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.
टीम ऑस्ट्रेलिया
डेविड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, ट्रेविस हेड, कॅमरून ग्रीन, एलेक्स केरी (विकेटकीपर), पॅट कमिंस (कर्णधार), मिशेल स्टार्क, नाथन लायन, स्कॉट बोलँड.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
WTC Final: शेरास सव्वाशेर... टीम इंडियाचा विराट की, ऑस्ट्रेलियाचा स्मिथ, ओव्हलवर कोण ठरणार बेस्ट?