WTC Final 2023 : टीम इंडियाला पुन्हा एकदा जागतिक कसोटी विजेतेपदाच्या गदेवर आपलं नाव कोरण्यात अपयश आलं. लंडनच्या ओव्हल मैदानात खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा 209 धावांनी पराभव केला. या पराभवानंतर टीम इंडियाच्या कामगिरीवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. त्याशिवाय टीम इंडियाच्या पराभवाची कारणे, चाचपण्यास सुरुवात केली. भारतीय संघाच्या पराभवाची पाच कारणे, खाली दिली आहेत...


पहिल्या डावात गोलंदाजांची निराशाजनक कामगिरी - 


भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या तासभरात हा निर्णय योग्य होता असे वाटत होते. पण त्यानंतर गोलंदाजांनी प्रभावहिन मारा केला. ट्रेविस हेड आणि स्मिथपुढे टीम इंडियाची गोलंदाजी दुबळी जाणवत होती. 76 धावांत ऑस्ट्रेलियाने तीन पलंदाज गमावले होते, अशा परिस्थितीत गोलंदाजांनी वर्चस्व निर्माण केले नाही. प्रभावहिन मारा केल्यामुळे ऑस्ट्रेलियाने 469 धावांचा डोंगर उभारला. स्मिथ आणि हेड यांनी 251 धावांची भागिदारी करत  ऑस्ट्रेलियाला मजबूत स्थितीत नेले. यावेळी टीम इंडियाच्या गोलंदाजांना विकेट घेण्यात अपयश आले. स्मिथ आणि हेड यांनी भारतीय गोलंदाजीचा समाचार घेतला, हाच सामन्यातील सर्वात मोठा फरक होय. 


फलंदाजांची हराकिरी - 


469 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाचा डाव 296 धावांवर आटोपला. शार्दुल आणि रहाणे यांच्या शतकी भागिदारीमुळे फॉलोऑन टळला. आघाडीच्या फलंदाजांना लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. गिल, रोहित, पुजारा, विराट आणि भरत यांना मोठी खेळी करता आली नाही. शार्दूल आणि रहाणे यांनी 50 धावांचा पल्ला ओलांडला.. रविंद्र जाडेजा याने जम बसल्यानंतर विकेट फेकली. टीम इंडियाचा डाव 296 धावांवर आटोपला... त्यामुळे भारतीय संघ 173 धावांनी पिछाडीवर राहिला.. मानसिकदृष्ट्या हा मोठा फरक होता. 
 
अश्विन प्लेईंग 11 बाहेर, मोठी चूक होती ?


आर. अश्विन याला प्लेईंग 11 मध्ये न खेळवणे ही रोहित शर्माची मोठी चूक होती, असे अनेक दिग्गजांना वाटले. रोहित शर्माच्या यानिर्णायावर अनेकांनी सवाल उपस्थित केले. आर. अश्विन जगातील आघाडीचा गोलंदाज आहे, असे असताना त्याला बाहेर बसवणे, मोठी चूक होती. ऑस्ट्रेलियाच्या लायन याने सामन्यात 5 विकेट घेतल्या. रविंद्र जाडेजा यानेही प्रभावी मारा केला... यांची आकडेवारी पाहाता, आर. अश्विन यानेही प्रभावी मारा केला असता. त्याशिवाय फलंदाजीतही योगदान दिले असते...  असे म्हटले जातेय. त्यामुळे अश्विनला बाहेर बसवणे चूक होती का?  उमेश यादव याच्या जागी अश्विनला संधी दिली असती तर... असा एक मतप्रवाह तयार झालाय. 


फलंदाजांनी तीच चुक दुसऱ्या डावात केली -
 
टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप विजयासाठी 444 धावांचे आव्हान मिळाले होते... रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियातील फलंदाजांनी विकेट फेकल्या. एकही फलंदाज प्रतिकार करताना दिसला नाही. रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रविंद्र जाडेजा आणि विराट कोहली या अनुभवी पाच फलंदाजांनी आपली विकेट सहज फेकली. पुजारा, रोहित आणि विराट यांनी जम बसल्यानंतर विकेट फेकली, परिणामी भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. 


IPL -


कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील अतिंम सामन्यात भारताच्या पराभवाचे आयपीएल हे एक कारण असल्याचे म्हटले जातेय. आयपीएल 29 मे 2023 रोजी संपले.. WTC ला 7 जून 2023 पासून सुरुवात झाली. भारतीय खेळाडू आयपीएलमध्ये व्यस्त होते... त्यामुळे कसोटी चॅम्पियनशीपची तयारी करण्यास पुरेसा वेळ मिळाला नाही. मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जाडेजा यांच्यासह अनेक खेळाडूंना आराम करण्यास पुरेस वेळ मिळाला नाही. 


आणखी वाचा :