Ajinkya Rahane Shardul Thakur : लॉर्ड शार्दूल ठाकूर आणि अजिंक्य राहणे यांनी खडूस फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाच्या मनसुब्यावर पाणी फेरले. 6 बाद 152 अशी दयनिय अवस्था टीम इंडियाची झाली होती. त्यावेळी मुंबईकर अजिंक्य रहाणे आणि शार्दूल ठाकूर ऑस्ट्रेलियाला नडले.. मोक्याच्या क्षणी दोघांनी शतकी भागिदारी केली. 145 चेंडूत 109 धावांची भागिदारी करत ऑस्ट्रेलियाच्या मनसुब्यावर पाणी फेरले. 


शार्दूल आणि अजिंक्य रहाणे यांच्या भागिदारीमुळे टीम इंडियावरील फॉलोऑनचे संकट टाळले. अजिंक्य रहाणे याने तब्बल 18 महिन्यानंतर कसोटीत कमबॅक केलेय. आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर अजिंक्य रहाणे एखाद्या योद्ध्याप्रमाणे लढला. रविंद्र जाडेजासोबत अजिंक्य रहाणे याने 71 धावांची भागिदारी केली. त्यानंतर शार्दूलच्या मदतीने 109 धावांची भर पाडली.


अजिंक्य रहाणेची दमदार खेळी - 


अजिंक्य रहाणे याने सुरुवातीला संयमी फलंदाजी केली. जाडेजा विस्फोटक फलंदाजी करत असताना रहाणे याने दुसऱ्या बाजूला चिवट फलंदाजी केली. जाडेजा बाद झाल्यानंतर रहाणे याने आक्रमक रुप धारण केले. राहणे याने 11 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 89 धावांची खेळी केली. 


2021 मध्ये झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये रहाणे याने सर्वाधिक धावा काढल्या होत्या. आताही रहाणे याने सर्वाधिक धावा चोपल्या आहेत. 


शार्दूलचा लढा - 


लॉर्ड शार्दूल ठाकूर याने अष्टपैलू खेळीचे प्रदर्शन केले. गोलंदाजीत चमक दाखवल्यानंतर फलंदाजीतही महत्वाचे योगदान दिले. आघाडीचे फलंदाज ढेपाळल्यानंतर शार्दूल ठाकूर याने चिवट फलंदाजी केली. शार्दूल ठाकूर याने 109 चेंडूत 51 धावांची खेळी केली. शार्दूल ठाकूर याने ओव्हल याने लागोपाठ तीन सामन्यात अर्धशतक झळकावलेय. असा पराक्रम करणारा तिसरा विदेशी खेळाडू ठरलाय. याआधी असा पराक्रम ब्रॅडमन आणि बॉर्डर यांनी केलाय. या यादीत शार्दूलचा समावेश झालाय. 






'खडूस' मुंबईकर ऑस्ट्रेलियाला नडले, अजिंक्य-शार्दूलमुळे फॉलोऑन टळला


अजिंक्य रहाणे आणि लॉर्ड शार्दूल ठाकूर या मुंबईकर खेळाडूंच्या फलंदाजीच्या बळावर टीम इंडियाने फॉलोऑन टाळलाय. अजिंक्य रहाणे याने 89 तर शार्दूल ठाकूर याने 51 धावांची खेळी करत भारताचा डाव सावरला. तिसऱ्या दिवशी भारताचा डाव 296 धावांवर संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाकडे अद्याप 173 धावांची आघाडी आहे. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार पॅट कमिन्स याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.