WPL 2023 : महिला प्रीमियर लीग (WPL) स्पर्धेतील आजच्या दिवसातील दुसरा सामना यूपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स (GG vs UPW) या संघामध्ये होत आहे. नुकतीच नाणेफेक झाली असून गुजरात संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात प्रथण गोलंदाजी करताना गुजरातला 143 धावांनी मुंबईकडून पराभ स्वीकारावा लागला होता. त्यानंतर आता मात्र प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यामुळे गुजरातचा संघ काय कमाल करणार ते पाहावे लागेल. दरम्यान कर्णधार बेथ मुनीला पहिल्या सामन्यात दुखापत झाल्यानंतर ती आज विश्रांतीवर आहे. अशा परिस्थितीत भारतीय अष्टपैलू स्नेह राणा या सामन्यात संघाचं नेतृत्व करताना दिसत आहे.
हा सामना नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर खेळला जाईल. जिथे फलंदाज आणि गोलंदाजांमध्ये सारखी लढाई दिसून येते. या खेळपट्टीवर, जिथे चेंडू थेट बॅटवर येतो त्यामुळे लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाला थोडा अधिक फायदा मिळू शकतो. दरम्यान यूपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स या महिला संघात खेळल्या जाणाऱ्या या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. त्यांच्याकडे संपूर्ण हंगामातील सामन्यांचे प्रसारण अधिकार आहेत. त्याच वेळी, या सामन्याचे ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमाच्या अॅप आणि वेबसाइटवरून पाहता येईल. ज्यामध्ये त्यांना हे सामने Jio सिनेमावर 4K मध्ये पाहण्याची सुविधा मिळेल.
कसे आहेत दोन्ही संघ?
यूपी वॉरियर्सचा संघ : एलिसा हिली (कर्णधार आणि विकेटकीपर), श्वेता सेहरावत, ताहलिया मॅकग्रा, दीप्ती शर्मा, ग्रेस हॅरिस, सिमरन शेख, किरण नवगिरे, देविका वैद्य, सोफी एक्लेस्टोन, अंजली सरवाणी, राजेश्वरी गायकवाड
गुजरात जायंट्सचा संघ : सब्भिनेनी मेघना, हरलीन देओल, अॅश्ले गार्डनर, सोफिया डंकले, अॅनाबेल सदरलँड, किम गर्थ, सुषमा वर्मा (विकेटकीपर), दयालन हेमलता, स्नेह राणा (कर्णधार), तनुजा कंवर, मानसी जोशी
दिल्लीचा आरसीबीवर 60 धावांनी विजय
आजच्या दिवसातील पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात मुंबईच्या ब्रेबॉर्न मैदानात पार पडला. या सामन्यात दिल्ली संघाने आधी स्फोटक फलंदाजीचं दर्शन घडवत तब्बल 223 धावा स्कोरबोर्डवर लावल्या आहेत. त्यानंतर 120 चेंडूत 224 धावा करण्यासाठी मैदानात आलेल्या आरसीबी संघाला हे मोठं लक्ष्य पार करता आलं नाही. कोणतीच खेळाडू अर्धशतकही झळकावू शकली नाही. ज्यामुळे संपूर्ण संघ 163 धावाच 20 षटकांत 8 गड्यांच्या बदल्यात करु शकला आणि सामना 60 धावांनी दिल्लीने जिंकला.
हे देखील वाचा-