Women’s Premier League 2023 : महिला प्रीमियर लीग (WPL) स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर (RCB vs DC) 60 धावांनी मोठा विजय मिळवला आहे. मुंबईच्या ब्रेबॉर्न मैदानात पार पडलेल्या या सामन्यात दिल्ली संघाने आधी स्फोटक फलंदाजीचं दर्शन घडवत तब्बल 223 धावा स्कोरबोर्डवर लावल्या आहेत. यावेळी दिल्लीची कर्णधार मेग लॅनिंग आणि सलामीवीर शेफाली यांनी दीडशेहून अधिक धावांची विक्रमी भागिदारी केली. त्यानंतर 120 चेंडूत 224 धावा करण्यासाठी मैदानात आलेल्या आरसीबी संघाला हे मोठं लक्ष्य पार करता आलं नाही. कोणतीच खेळाडू अर्धशतकही झळकावू शकली नाही. ज्यामुळे संपूर्ण संघ 163 धावाच 20 षटकांत 8 गड्यांच्या बदल्यात करु शकला आणि सामना 60 धावांनी दिल्लीने जिंकला. 


सामन्यात सर्वात आधी नाणेफेक जिंकून बंगळुरुची कर्णधार स्मृती मानधनाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीला कमी धावांत रोखून निर्धारीत लक्ष्य पूर्ण करण्याचा त्यांचा डाव होता. पण दिल्लीने पहिल्या डावात उभारलेल्या मोठ्या धावसंख्येमुळे आरसीबीचा प्लॅन फसला. दरम्यान दिल्ली संघाने इतकी मोठी धावसंख्या उभारली त्यामागे शेफाली आणि मेग यांची तगडी भागिदारी होती. यामध्ये शेफालीने सर्वाधिक 84 तर मेगने 72 धावा केल्या. या भागीदारीत मेगने 167.44 च्या स्ट्राईक रेटने 43 चेंडूत 72 धावा केल्या, तर भारताची सलामीवीर शफाली वर्माने 186.67 च्या स्ट्राईक रेटने 45 चेंडूत 84 धावा केल्या, ज्यात तिने 10 चौकार आणि 4 षटकारही ठोकले. दोघीही बाद झाल्यावर जेमिमाने नाबाद 22 आणि मारिजन कॅपने नाबाद 39 धावांची छोटी पण दमदार खेळी यावेळी केली. विशेष म्हणजे दिल्ली कॅपिटल्सच्या या दोन्ही खेळाडूंनी महिला प्रीमियर लीग म्हणजेच WPL च्या इतिहासात पहिल्या विकेटसाठी किंवा कोणत्याही विकेटसाठी 100 आणि 150 धावांची पहिली भागीदारी करण्याचा विक्रमही केला.


नोरीसनं घेतल्या 5 विकेट्स


224 धावांचे तगडे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या आरसीबी संघाकडून कोणत्याच खेळाडूला खास कामगिरी करता आली नाही. काही खेळाडूंनी 30 पार धावसंख्या केल्याने 163 पर्यंत संघ पोहोचला. पण 224 ही धावसंख्या फारच दूर असल्याने तब्बल 60 धावांनी सामना आरसीबीला गमवावा लागला. यावेळी आरसीबीकडून स्मृती मानधनाने 35, एलिस पेरीने 31, एच नाईटने 34 तर मेगनने नाबाद 30 धावांची खेळी केली.पण दिल्लीच्या टारा नोरीस या अमेरिकेच्या बोलरने तब्बल 5 विकेट्स घेतल्याने आरसीबी संघाला मोठं नुकसान झालं आणि त्यांचा संघ 163 धावांच 20 षटकात करु शकला.




हे देखील वाचा-