WPL 2023 : महिला प्रीमियर लीगमध्ये (WPL) दिल्ली कॅपिटल्सनेही आपल्या संघाची कमान ऑस्ट्रेलियान खेळाडूकडे सोपवली आहे. या फ्रँचायझीने मेग लॅनिंगची कर्णधार म्हणून निवड केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या महिला टी-20 विश्वचषकात मेगनेच ऑस्ट्रेलियन संघाला चॅम्पियन बनवलं. तिच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने यावेळी एकही सामना न गमावता विश्वचषक जिंकला. 30 वर्षीय मेग लॅनिंग पाच वेळा टी-20 वर्ल्ड चॅम्पियन संघाची सदस्य आहे. वयाच्या 18 व्या वर्षी तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 12 वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या या व्यावसायिक कारकिर्दीत तिने 241 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये 6 कसोटी, 103 एकदिवसीय आणि 132 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश आहे.


T20I मध्ये 100 सामन्यांचं नेतृत्व करण्याचा अनुभव


मेग लॅनिंगने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तीन हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. T20I मध्ये तिची फलंदाजीची सरासरी 36.61 आहे आणि स्ट्राइक रेट 116.37 आहे. तिने T20I मध्येही दोन शतके झळकावली आहेत. तिने 132 पैकी 100 टी-20 सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवलं आहे. त्यामुळे हे सर्व पाहता तिला कर्णधारपदाचा चांगला अनुभव आहे. म्हणून दिल्लीने तिला कर्णधारपद दिलं आहे. दिल्ली कॅपिटल्सने महिला प्रीमियर लीगच्या लिलावात 1.1 कोटी रुपयांची बोली लावून मेग लॅनिंगचा संघात समावेश केला.


जेमिमा रॉड्रिग्जला उपकर्णधारपद  


भारतीय मधल्या फळीतील युवा फलंदाज जेमिमा रॉड्रिग्जला दिल्ली कॅपिटल्सने उपकर्णधार बनवलं आहे. 22 वर्षीय जेमिमाने आतापर्यंत 80 टी-20 आंतरराष्ट्रीय आणि 21 एकदिवसीय सामने खेळले आहेत. तिच्या नावावर दोन हजारांहून अधिक आंतरराष्ट्रीय धावा आहेत. जेमिमाने अनेक वेळा भारतीय संघासाठी मॅचविनिंग इनिंग्स खेळल्या आहेत.


WPL 2023 मध्ये तीन ऑस्ट्रेलियन कर्णधार


जिथे मेग लॅनिंग दिल्ली कॅपिटल्सची कमान सांभाळत आहे. त्याचबरोबर गुजरात जायंट्सची जबाबदारी ऑस्ट्रेलियाची सलामीवीर बेथ मुनीच्या खांद्यावर आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाची यष्टिरक्षक फलंदाज अॅलिसा हिलीला यूपी वॉरियर्सची कर्णधार बनवण्यात आले आहे. म्हणजेच 5 संघांपैकी तीन संघांचे कर्णधार ऑस्ट्रेलियन खेळाडू आहेत. उर्वरित दोन संघांचे कर्णधार हे फक्त भारतीय खेळाडू आहेत. स्मृती मंधानाला आरसीबीचे कर्णधार बनवण्यात आले आहे आणि हरमनप्रीतकडे मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद आहे.


कुठे पाहाल WPL लाईव्ह सामना?


Viacom-18 ने महिला प्रीमियर लीगच्या सर्व सामन्यांचे डिजिटल आणि टीव्ही प्रसारण हक्क विकत घेतले आहेत. ज्यामुळे सर्व 22 सामन्यांचे थेट प्रक्षेपण व्हायकॉम-18 च्या स्पोर्ट्स चॅनेल 'स्पोर्ट्स-18 1', 'स्पोर्ट्स-18 1एचडी' आणि 'स्पोर्ट्स-18 खेल' या वाहिन्यांवर केले जाईल. या सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमा अॅपवर उपलब्ध असेल.


हे देखील वाचा-