World Cup History : भारतात होणाऱ्या विश्वचषकाला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेत. 5 ऑक्टोबरपासून विश्वचषकाच्या रनसंग्रामाला सुरुवात होणार आहे. या विश्वचषकात अनेक रेकॉर्डस मोडले जातील, नवे विक्रम होतील... यंदाची 13 वी विश्वचषक स्पर्धा आहे. पण आतापर्यंत झालेल्या 12 विश्वचषकात सर्वात यशस्वी विकेटकीपर कोण? विकेटमागे सर्वाधिक फलंदाजांना कुणी बाद केले? याबाबत माहितेय का? विश्वचषकातील यशस्वी पाच विकेटकीपरबद्दल जाणून घेऊयात.... पाच यशस्वी विकेटकीपरमध्ये धोनी तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. पाकिस्तान आणि इंग्लंडच्या विकेटकीपरचा अव्वल पाचमध्ये समावेश नाही. पाहूयात, याच खास यादीबाबत सविस्तर...


5. मार्क बाउचर (Mark Boucher) : 


विश्वचषकात विकेटच्या मागे सर्वाधिक फलंदाजांना बाद करणाऱ्या विकेटकीपरमध्ये दक्षिण आफ्रिकेचा मार्क बाऊचर पाचव्या क्रमांकावर विराजमान आहे.  मार्क बाऊचरने दक्षिण आफ्रिकासाठी विश्वचषकात 25 सामन्यात प्रतिनिधित्व केले आहे. या 25 सामन्यात बाऊचरने विकेटच्या मागे 31 खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवला आहे. बाऊचर दक्षिण आफ्रिकेचा सर्वात यशस्वी विकेटकीपर म्हणून ओळखला जातो. 


4. ब्रँडन मॅक्युलम (Brendon McCullum) : 


न्यूझीलंडचा विकेटकीपर फलंदाज ब्रँडन मॅक्युलमचाही या यादीत समावेश आहे. ब्रँडन मॅक्युलम  चौथ्या क्रमांकावर विराजमान आहे. ब्रँडन मॅक्युलम विस्फोटक फलंदाजीसोबत चपळ विकेटकीपर म्हणून ओळखला जातो. ब्रँडन मॅक्युलमने न्यूझीलंडसाठी 34 विश्वचषकाचे सामने खेळले आहेत, यामधील 25 डावात त्याने विकेटमागे 32 फलंदाजांची शिकार केली. यामध्ये 30 झेल आणि दोन स्टपिंगचा समावेश आहे. 


3. महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) : 


भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी याला कोणत्याही परिचयाची गरज नाही. भारताच्या सर्वोत्तम विकिटेकीपरपैकी धोनी एक आहे. धोनीने भारताला दोन विश्वचषक जिंकून दिले आहेत. 2007 टी20 आणि 2011 वनडे वर्ल्डकप भारताला जिंकून देण्यात धोनीचा मोठा वाटा आहे. धोनीच्या विकेटकिपींगचे जगभरात चाहते आहे. विकेटच्या मागे धोनी चपळतेने आपले काम करतो. धोनीने विश्वचषकात 29 सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केलेय. धोनीने विकेटच्या मागे 42 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.  यामध्ये 24 झेल आणि 8 स्टपिंगचा समावेश आहे. 


2. एडम गिलख्रिस्ट (Adam Gilchrist) : 


एडम गिलख्रिस्टने विकेटच्या मागे दमदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियासाठी अनेकदा सामना पलटवला आहे. विश्वचषकातील यशस्वी विकेटकीपरमध्ये एडम गिलख्रिस्ट दुसऱ्या क्रमांकावर आहे. एडम गिलख्रिस्टने वर्ल्डकपचे 31 सामने खेळले आहेत, यामध्ये विकेटच्या मागे 52 बळी घेतले आहेत. त्यामध्ये 45 झेल आणि सात स्टपिंगचा समावेश आहे. 


1. कुमार संगाकारा (Kumar Sangakkara) : 


श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगाकारा या यादीत पहिल्या स्थानावर विराजमान आहे. विश्वचषकात सर्वात यशस्वी विकिटकीपर म्हणून कुमार संगाकारा याची नोंद आहे. सांगाकाराने श्रीलंकासाठी 37 विश्वचषकाचे सामने खेळले आहेत. त्याने विकेटच्या मागे 54 फलंदाजांना तंबूत धाडलेय. कुमार सांगाकाराने 41 झेल आणि 13 स्टपिंग केल्या आहेत.