World Cup 2023 : अटीतटीच्या सामन्यात पाकिस्तानला दक्षिण आफ्रिकेकडून (PAK vs SA) एका विकेटने पराभवाचा सामना करावा लागला. सहा सामन्यातील पाकिस्तानचा हा चौथा पराभव होता. पाकिस्तानने सुरुवातीच्या दोन सामन्यात विजय मिळवला, त्यानंतर लागोपाठ चार सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे पाकिस्तानचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले आहे. पाकिस्तान संघाला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. गोलंदाजी, फलंदाजी आणि फिल्डिंगमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंनी कच खाल्ली. विश्वचषकातील निराशाजनक कामगिरीनंतर बाबर आझम आणि खेळाडूंच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.
बाबर आझमचे नेतृत्वावर पाकिस्तानमधून टीकेची झोड उडत आहे. पाकिस्तानची गोलंदाजीही कमकुवत दिसत आहे. फलंदाजीत बाबर स्वत: मोठी कामगिरी करु शकला नाही. पाकिस्तानचे कोच मिकी ऑर्थर यांनी आफ्रिकेविरोधातील सामन्यानंतर पुढील तीन सामने जिंकून शेवट गोड करु असे सांगितले. पाकिस्तान संघाचे विश्वचषकातील आव्हान आता जवळपास संपुष्टात आले आहे. पण काही करिष्मा झाला तरच त्यांना सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळेल. त्यासाठी त्यांना इतर संघाच्या कामगिरीवर अवलंबून राहावे लागेल.
पाकिस्तानची आतापर्यंतची कामगिरी कशी राहिली ?
पाकिस्तान संघाचा विश्वचषकातील पहिला सामना दुबळ्या नेदरलँडविरोधात झाला. नेदरलँड संघाला पाकिस्तानने 81 धावांनी पराभूत केले. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 48.2 षटकात 345 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरदाखल नेदरलँडच्या संघाला 205 धावांत गुंडाळले.
पाकिस्तानने दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा सहा विकेटने पराभव केला. श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजी करताा 344 धावांचा डोंगर उभारला होता. पाकिस्तानच्या फलंदाजांनी हे आव्हान सहज पार केले. हा विश्वचषकातील सर्वात मोठा रनचेस होता. पाकिस्तानने चार विकेटच्या मोबदल्यात 1345 धावांपर्यंत मजल मारली होती.
सलग दोन सामन्यात विजय मिळवणाऱ्या पाकिस्तानचा भारताविरोधातील पराभव झाला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा सात विकेटने पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा डाव 191 धावांत संपुष्टात आला. भारताने हे आव्हान सात विकेट राखून सहज पार केले.
पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये बेंगळुरुच्या मैदानात सामना झाला. या सामन्यात पाकिस्तानला 62 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्टेलियाने प्रथम फलंदाजी करताना 367 धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरदाखल पाकिस्तानचा संघ 305 धावांपर्यंत मजल मारु शकला.
23 ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तानने पाकिस्तानचा पराभव करत विश्वचषकातील उलटफेर केला. चेन्नईच्या मैदानावर झालेल्या सामन्यात अफगाणिस्तान संघाने आठ विकेटने विजय मिळवला. पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना 282 धावांपर्यंत मजल मारली होती. अफगाणिस्तान संघाने हे आव्हान आठ विकेट राखून सहज पार केले. हा पराभव पाकिस्तानच्या जिव्हारी लागला.
27 ऑक्टोबर रोजी करो या मरोच्या सामन्यात पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला. दक्षिण आफ्रिकाविरोधात अटीतटीच्या सामन्यात पाकिस्तानचा एक विकेटने पराभव झाला. या पराभवासह पाकिस्तानचे विश्वचषकातील आव्हानही संपुष्टात आले. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 270 धावा फलकावर लावल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेने हे आव्हान एक विकेट राखून पार केले.
आता पुढील सामने कोणते ?
पाकिस्तान संघाला सहा सामन्यात चार पराभवाचा सामना करावा लागला. त्यांचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आलेय. आता पुढील सामने जिंकून पाकिस्तान शेवट गोड करण्याच्या इराद्याने मैदान उतरणार आहे. म्हणजे, पाकिस्तान संघाने शेवट गोड केला तर त्या संघापुढील अडचणी वाढणार आहेत. पाकिस्तानचा पुढील सामना बांगलादेशविरोधात 31 ऑक्टोबर रोजी होणार आहे. बांगलादेशही स्पर्धेतून जवळपास बाहेर गेल्यात जमा आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना निर्णायक ठरणार आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये 4 नोव्हेंबर रोजी सामना होणार आहे. तर इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात 11 नोव्हेंबर रोजी सामना रंगणार आहे. इंग्लंड आणि बांगलादेश यांचेही विश्वचषकातील आव्हान संपल्यात जमा आहे.