चेस्टर ले स्ट्रीट : विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेने वेस्ट इंडिजचा 23 धावांनी पराभव  केला. खराब सुरुवातीनंतरही निकोलस पूरनचे झुंझार शतक आणि फॅबियन अलेनच्या अर्धशतकाच्या बळावर वेस्ट इंडिजने श्रीलंकेला चांगलेच सळो की पळो करून सोडले. मात्र हे दोघेही बाद झाल्यानंतर वेस्ट इंडिजला पराभवाचा सामना करावा लागला.


वेस्ट इंडिजकडून निकोलस पुरनने 103 चेंडूत 11 चौकार आणि 4 षटकारांच्या बळावर 118 धावा केल्या तर  फॅबियन अलेनने 32 चेंडूत तडाखेबाज 51 धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 7 चौकार आणि एक षटकार लगावला. संघ संकटात असताना या दोघांनी चांगली भागिदारी करत संघाला विजयाकडे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र ते अपयशी ठरले.

विंडीजकडून गेल 35, हेटमायर 29 आणि होल्डर 26 वगळता इतर फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. श्रीलंकेकडून मलिंगाने तीन तर रजिथा, वंदेरसाय, मॅथ्यूने प्रत्येकी एक-एक विकेट्स घेतल्या.

त्याआधी, या सामन्यात श्रीलंकेनं 50 षटकांत सहा बाद 337 धावांची मजल मारली होती. अविष्का फर्नांडोनं झळकावलेलं शतक श्रीलंकेच्या डावात मोलाचं ठरलं. त्यानं 103 चेंडूंत नऊ चौकार आणि दोन षटकारांसह 104 धावांची खेळी उभारली. फर्नांडोचं वन डे सामन्यांच्या कारकीर्दीतलं हे पहिलंच ठरलं.

श्रीलंकेकडून दिमुथ करुणारत्नेनं 32, कुशल परेरानं 64, कुशल मेंडिसनं 39, अँजलो मॅथ्यूजनं 26 आणि लाहिरु थिरीमनेनं नाबाद 45 धावांची खेळी उभारली. करुणारत्ने आणि परेरानं श्रीलंकेला 93 धावांची सलामी दिली. मग फर्नांडोनं मेंडिस, मॅथ्यूज आणि थिरीमनेच्या साथीनं छोट्यामोठ्या भागिदारी रचल्या.

अविष्का फर्नांडोडूने दमदार शतक झळकावत अनोखा विक्रम केला आहे. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात शतक झळकवणारा तो सर्वात तरुण श्रीलंकन फलंदाज तर ठरला. सोबतच विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात जगात देखील तो तिसऱ्या क्रमांकाचा युवा फलंदाज ठरला.