मुंबई : विश्वचषकाच्या साखळी सामन्यात यजमान इंग्लंडने टीम इंडियाचा 31 धावांनी पराभव केला. टीम इंडिया या पराभवानंतर पाकिस्तान आणि बांग्लादेशचे चाहते खूप निराश झाले आहे. टीम इंडियाच्या या पराभवावर आमची प्रार्थनासुद्धा भारतासाठी कामी न आल्याचं वक्तव्य पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज खद्द शोएब अख्तरने केलं आहे.


कालच्या सामन्यात आम्हाला भारताने इंग्लंडला हरवलेलं हवं होतं, कारण इंग्लंड हरल्यास विश्वचषकातील आमची पुढची वाटचाल सुरळीत झाली असती. पण पाकिस्तान आणि बांग्लादेशातील कोट्यावधी लोकांचे आशीर्वाद भारतापर्यंत पोहचू शकले नाहीत, असं मतं शोएब अख्तरने व्यक्त केलं आहे. भारत पाकिस्तान फाळणीनंतर पाकिस्तानने भारताला प्रथमच पाठिंबा दिला. टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थाना केल्या असल्याचंही शोएब म्हणाला.

दरम्यान या विजयानंतर इंग्लंडच्या उपांत्य फेरीच्या आशा कायम राहिल्या आहेत. मात्र दुसरीकडे भारताच्या विजयासाठी प्रार्थना करणाऱ्या पाकिस्तानचा प्रवास मात्र आता खडतर झाला आहे. भारताच्या पराभवामुळे पाकिस्तानच्या गोटात चिंतेच वातावरण पसरलं आहे. उपांत्य फेरीत दाखल होण्यासाठी पाकिस्तानला बांगलादेशविरुद्ध विजयासोबत इतर संघाच्या कामगिरीवरही अवलंबून रहावं लागणार आहे.

सामन्यात काय झालं?

बर्मिंगहॅमच्या लढाईत इंग्लंडनं भारतावर 31 धावांनी मात करून, आठ सामन्यांमधला पाचवा विजय साजरा केला. या विजयामुळं इंग्लंडच्या विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा अजूनही शाबूत आहेत. या सामन्यात इंग्लंडनं दिलेल्या 338 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला 50 षटकांत पाच बाद 306धावांचीच मजल मारता आली. रोहित शर्मानं झळकावलेलं शतक भारताच्या डावाचं मुख्य वैशिष्ट्य ठरलं. त्यानं विराट कोहलीच्या साथीनं दुसऱ्या विकेटसाठी 138 धावांची भागीदारी रचून भारताच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या. पण ती जोडी फुटली आणि टीम इंडिया विजयापासून दूर राहिली.