मँचेस्टर : इंग्लंडनं अफगाणिस्तानचा 150 धावांनी धुव्वा उडवून, विश्वचषकातल्या पाचव्या सामन्यात आपला चौथा विजय साजरा केला. या विजयासह इंग्लंडनं गुणतालिकेत आठ गुणांसह अव्वल स्थान गाठलं. मॅन्चेस्टरमधल्या सामन्यात इंग्लंडनं अफगाणिस्तानला विजयासाठी 398 धावांचं आव्हान दिलं होतं.


पण जोफ्रा आर्चर, आदिल रशिद आणि मार्क वूडच्या प्रभावी आक्रमणासमोर अफगाणिस्तानला 50 षटकांत आठ बाद 247 धावांची मजल मारता आली. आर्चर आणि रशिदनं प्रत्येकी तीन, तर वूडनं दोन फलंदाजांना माघारी धाडलं.

अफगाणिस्तानकडून हसमतउल्लाह शाहिदीने सर्वाधिक 76 धावांची खेळी केली. तर रहमत शाहने 46 आणि असघर अफगाणने 44 धावांची खेळी केली.

तत्पूर्वी, इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गनने अफगाणिस्तानविरुद्ध षटकारांची बरसात केली. मॉर्गनच्या तुफानी फलंदाजीच्या बळावर इंग्लंडने अफगाणिस्तानच्या समोर 397 धावांचा डोंगर उभा केला होता. कर्णधार मॉर्गनने शानदार खेळी करत केवळ 57 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याने 71 चेंडूत 17 षटकार आणि चार चौकारांच्या मदतीने 148 धावांची खेळी केली.

मॉर्गनसह जॉनी बेअरस्टोनं 90 तर ज्यो रुटनंही 88 धावांची खेळी उभारली. त्यामुळे इंग्लंडला 50 षटकांत सहा बाद 397 धावांचा डोंगर उभारता आला. यंदाच्या विश्वचषकातली ही सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. अफगाणिस्तानचा अनुभवी गोलंदाज राशीद खान सर्वाधिक महागडा ठरला. इंग्लंडच्या फलंदाजांनी त्याच्या नऊ षटकांत तब्बल 110 धावा कुटल्या.